सुषमा अंधारेंचं श्रावणात देवदर्शन; भिमाशंकर मंदिरात दुग्धाभिषेक, टेकविला माथा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 03:02 PM2023-09-11T15:02:26+5:302023-09-11T15:03:44+5:30
हिंदूच्या रितीरिवाजाप्रमाणे श्रावण महिना पवित्र मानला जातो. या महिन्यात महादेवाची भक्ती आणि उपासना केली जाते
पुणे - शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांचे जुने व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या व्हिडिओच्या माध्यमातून त्या हिंदूंवर टीका करत असल्याचं सांगण्याचा प्रयत्न ट्रोलर्संकडून केला जात होता. त्यात, नवरात्री उत्सवातील देवी बसण्यावरुनही त्यांनी भाष्य केलं होतं. मात्र, ट्रोलर्संच्या टीकेलाही त्यांनी पुन्हा उत्तर दिलं आहे. अंधारे या नास्तिक असल्याचंही काहींनी सोशल मीडियातून म्हटले होते. मात्र, आता त्यांनी मंदिरात जाऊन दुग्धाभिषेक केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
हिंदूच्या रितीरिवाजाप्रमाणे श्रावण महिना पवित्र मानला जातो. या महिन्यात महादेवाची भक्ती आणि उपासना केली जाते. त्यामुळे, महादेव मंदिरात भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते. तर, १२ ज्योतिर्लिंग असलेल्या शिवमंदिरातही भक्तांची मादियाळी दिसून येते. पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे चौथ्या आणि श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी लाखो भाविक दर्शनासाठी आले आहेत. पहाटेपासूनच दर्शनासाठी शिवभक्तांनी मंदिरात गर्दी होती. तर, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी, त्यांनी महादेवाच्या पिंडीला दुग्धाभिषेक करत माथाही टेकवला. सुषमा अंधारे यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियातून समोर आला आहे. त्यांच्यासमवेत शिवसेना आमदार सचिन अहिर हेही मंदिरात होते.
दरम्यान, देशातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात ५ मोठी मंदिरे आहेत. त्यापैकी, ३ ज्योतिर्लिंग असल्याचं मानले जाते. त्यामध्ये, भिमांशकर हे एक असून, नाशिकचं त्र्यंबकेश्वर, हिंगोलीचं औंढा-नागनाथ, परळीचं परळी वैजिनाथ आणि संभाजीनगरचं घृष्णेश्वर हेही ज्योतिर्लिंग प्रसिद्ध आहेत. श्रावण महिन्यात येथेही भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते.