महिलेच्या खुनप्रकरणी संशयितास तेलंगणातून घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2018 02:59 PM2018-01-07T14:59:47+5:302018-01-07T15:00:20+5:30
वारजे येथे आठवडाभरापूर्वी झालेल्या मजूर कविता राठोड हिच्या खून प्रकरणातील एका संशयित आरोपीला पोलिसांनी किरकोळ माहितीच्या आधारे माग काढत नक्षलवादी भागातून ताब्यात घेतले.
पुणे : वारजे येथे आठवडाभरापूर्वी झालेल्या मजूर कविता राठोड हिच्या खून प्रकरणातील एका संशयित आरोपीला पोलिसांनी किरकोळ माहितीच्या आधारे माग काढत नक्षलवादी भागातून ताब्यात घेतले.
मजूर कविता राठोड ही महिला २९ डिसेंबर रोजी कामावरून घरी परतलीच नाही. सर्वत्र शोध घेतल्यानंतर तिच्या पतीने ३० डिसेंबरला पोलीस ठाण्यात हरविली असल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर दोन दिवसांनी वारजे येथे आरएमडी इन्स्टिट्यूट जवळील हायवेच्या बाजूला काम सुरू असलेल्या पादचारी मार्गावर तिचा मृतदेह सापडला होता. खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह जाळून पोत्यात भरुन तेथे टाकून देण्यात आला होता.
त्यानंतर सीसीटीव्ही आणि अन्य काही किरकोळ तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आठवडाभरात संशयित आरोपी गोपाळ राठोड याला तेलंगण-आंध्रप्रदेश बॉर्डरवरील नक्षलवादी भागातून ताब्यात घेतले. संशयिताला ताब्यात घेऊन पोलीस पथक पुण्याकडे निघाले असून ते रविवारी सायंकाळपर्यंत येण्याची शक्यता आहे़ वारजे पोलीस पुढील तपास करीत आहेत.