Zika Virus: पुण्यात झिकाने दाेन ज्येष्ठांचे संशयित मृत्यू; झिकाबराेबरच इतरही हाेते आजार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 11:54 AM2024-07-28T11:54:42+5:302024-07-28T11:55:39+5:30
दोघांचा मृत्यू झिकामुळे झाला की, इतर गुंतागुंतीमुळे झाला याची तपासणी आराेग्य विभागाकडून करण्यात येणार
पुणे: पुण्यात झिकाबाधित असलेल्या दाेन ज्येष्ठ नागरिकांचामृत्यू झाला आहे. त्यांना झिकाबराेबरच इतरही व्याधी हाेत्या. त्यांना हृदयाचा आजार आणि यकृताचा आजार हाेता. त्यामुळे त्यांचा मृत्यू झिकामुळे झाला की, इतर गुंतागुंतीमुळे झाला याची तपासणी आराेग्य विभागाकडून करण्यात येणार आहे. याबाबत महापालिकेच्या आराेग्य विभागाने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला पत्र लिहिले आहे. रविवारी झिकाचे आणखी ८ रुग्ण आढळून आले असून, एकूण रुग्णांची संख्या ४५ वर पाेहोचली आहे.
मृत्यू झालेले पेशंटचे वय हे ७१ पेक्षा जास्त हाेते. त्यापैकी एक सह्याद्री हाॅस्पिटल आणि दुसरा रुग्ण हा जाेशी हाॅस्पिटलमध्ये दाखल हाेते. त्याचा १४ जुलै राेजी मृत्यू झाला हाेता. जोशी रुग्णालयातील रुग्ण वारजे येथील असून, १४ जुलै रोजी उच्च रक्तदाबासह आरोग्यासंबंधीच्या आजारांमुळे त्यांना मृत घोषित करण्यात आले होते, तर १९ जुलै रोजी त्यांच्या नमुन्यांमध्ये ‘झिका संसर्गा’चे निदान झाले हाेते. दुसरा रुग्ण खराडी येथील असून, त्याला सह्याद्रीमध्ये दाखल करण्यात आले होते. सेप्टिक शॉकमुळे मल्टिपल ऑर्गन फेल्युअर आणि सिस्टीमिक इन्फ्लॅमेटरी सिंड्रोमही हाेता. त्याला २१ जुलै रोजी मृत घोषित करण्यात आले आणि २३ जुलै रोजी त्याला झिकाचे निदान झाले. शहरात आणखी ८ रुग्णांचा अहवाल झिकासाठी पाॅझिटिव्ह आला असून, त्यामध्ये दहा वर्षांच्या बालकाचाही समावेश आहे.