जिरेगावात महिला संशयास्पद बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 01:03 AM2019-01-10T01:03:34+5:302019-01-10T01:03:45+5:30
खुनाची चर्चा : बनाव असल्याचा पोलिसांचा अंदाज
कुरकुंभ : जिरेगाव (ता.दौंड) येथील कौठडी रस्त्यावर गायींच्या गोठ्यात मजूर म्हणून काम करीत असलेल्या निरंजन यादव याची पत्नी हिना निरंजन यादव (वय अंदाजे २८, दोघेही मूळ राहणार देवचंद, ता.राघोपूर, जिल्हा बैशाली,बिहार) ही बुधवारी पहाट बेपत्ता झाली. तिचा कोणताच ठावठिकाणा नसल्याने तिचा घातपात झाल्याची चर्चा परिसरात होत असून पोलिसांनी मात्र हा प्रकार म्हणजे बनाव असल्याचे सांगितले.
दरम्यान घटनेच्या ठिकाणी सापडलेल्या रक्ताचे नमुने तपासासाठी पाठवले असून याबाबत लवकरच सत्यता समोर येईल अशी प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांनी दिली आहे. याबाबत पोलिसांनी सागंतिलेली माहिती अशी की, जिरेगाव परिसरात नंदकुमार जाधव (रा. कोथरूड, पुणे) यांच्या मालकीचे शेत असून यामध्ये गिर गायींचा गोठा आहे. यामध्ये निरंजन यादव त्याची पत्नी हीना व वडील शंकर राय व दोन छोटी मुले राहत आहेत. बुधवारी पहाटेपासून हीना बेपत्ता झाल्यावर परिसरात तिचा शोध करण्यात आला. त्यावेळी या परिसरात असणाऱ्या गोठ्याच्या बाजूला रक्ताने माखलेली साडी आढळली तर बाजूलाच असणाºया विहिरीच्या आत एका साडीला दगड बांधून आत टाकलेले आढलले. त्यामुळे हिनाचा घातपात झाल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान दौंडचे पोलीस निरीक्षक सुनील महाडीक,पोलीस जमादार के. बी. शिंदे यांनी घटनेच्या ठिकाणी तात्काळ भेट दिली. त्यांनी केलेल्या प्राथमिक तपासात हीना पळून गेल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला तर रक्त आणि विहिरीतीलसाडी वगैरे हा बनाव असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. मात्र तपासासाठी रक्ताचे नमूने त्यांनी तपासणीसाठी पाठविले आहेत.
कुरकुंभ येथे आज हीना बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांनी नोंद केली असून पुढील तपास सुरु आहे. यासाठी सर्व बाबी विचारात घेवून तपास दूरू आहे. यादव कुटुंबाची कसून चौकशी करण्यात आली असून बारामती परिसरातील त्यांच्या ओळखीचे अन्य काही जणांना देखील तपासासाठी पोलिसांनी बोलावले आहे. जिरेगाव येथील जंगल परिसरात यापूर्वी देखील दोन वेळेस मृतदेह आढळून आले होते. मात्र पोलीसांनी अगदी नाममात्र पुराव्यावरून दोन्ही गुन्ह्याची उकल केली आहे. त्यामुळे या गुन्ह्याबाबत पोलिसांनाही खोलवर तपास करावा लागणार आहे.