स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश : महिला चालिकेला अटक : ५ तरुणींची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 03:38 PM2018-09-08T15:38:41+5:302018-09-08T15:40:57+5:30
पर्यटन व्हिसावर आलेल्या थायलंडमधील तरुणींना वेश्याव्यवयासास प्रवृत्त केल्याप्रकरणी दलाल महिलेला अटक करण्यात आली.
पुणे : पर्यटन व्हिसावर आलेल्या थायलंडमधील तरुणींना वेश्याव्यवयासास प्रवृत्त केल्याप्रकरणी दलाल महिलेला अटक करण्यात आली. कोंढवा भागातील एका मसाज पार्लरवर पोलिसांनी छापा टाकून थायलंडमधील तीन तरुणी व भारतातील मिझोराम आणि नागालँडमधील २ तरुणी अशा ५ जणांना ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी मसाज सेंटर चालक महिला पेटखीव हुतराई पमाई (वय ३७, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) हिला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रिया टिळेकर यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोंढवा भागातील एका मॉलमध्ये मसाज सेंटर आहे. तेथे थायलंडमधील तरुणी वेश्याव्यवसाय करत असल्याची माहिती पोलीस नाईक विलास तोगे यांना मिळाली. बनावट ग्राहकाच्या माध्यमातून शहनिशा करण्यात आल्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी रात्री तेथे छापा टाकून ५ तरूणींना ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्या तीन तरूणी थायलंडमधील आहेत. उर्वरित दोघी मिझोराम आणि नागलँडमधील रहिवासी असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलींद गायकवाड, गुन्हे शाखेचे निरीक्षक महादेव कुंभार, उपनिरीक्षक प्रिया टिळेकर, सहाय्यक फौजदार देशमुख, तोगे, गवळी, ढोले, थोरात, मुकाडे आदींनी केली.