ससूनच्या अधिष्ठात्यांना निलंबित करा; आमदार रवींद्र धंगेकर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
By राजू इनामदार | Published: October 19, 2023 08:58 PM2023-10-19T20:58:33+5:302023-10-19T20:59:27+5:30
आमदार रवींद्र धंगेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ससूनचे अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांना निलंबित करावे, अशी मागणी केली आहे....
पुणे : ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपी ललित पाटील ससूनमध्ये उपचार घेत असताना तो अय्याशीचे जीवन जगत होता. याचे छायाचित्रांसह पुरावे पुढे आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आमदार रवींद्र धंगेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ससूनचे अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांना निलंबित करावे, अशी मागणी केली आहे. याबाबतचे लेखी पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे.
सरकारचे या गंभीर प्रकरणाकडे सुरुवातीपासून लक्ष नाही. हा अमली पदार्थ तस्करीचा प्रकार आहे. देशातील तरुणाई यातून पोखरली जात आहे. त्यातील आरोपींना अशा प्रकारे सरकारी आश्रय मिळतोय, असे लक्षात आल्यानंतर सरकारने त्वरित या प्रकरणात कारवाई करणे अपेक्षित होते, मात्र त्याऐवजी ससूनचे अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांना संरक्षण दिले जात आहे, अशी घणाघाती टीका धंगेकर यांनी केली.
धंगेकर म्हणाले, दररोज या प्रकरणात धक्कादायक गोष्टी बाहेर येत आहेत. ड्रग्ज माफिया ललित पाटील कित्येक महिने ससून रुग्णालयात मुक्काम टाकून ऐशोआरामात जीवन जगत होता व तेथूनच ड्रग्जचे रॅकेट चालवित होता. त्याला ससूनमधून पाठिंबा होता हेही आता दिसत आहे. त्यामुळे पूर्वी गंभीरपणे घेतले नसेल तर आता तरी सरकारने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखावे व डॉ. ठाकूर यांना निलंबित करावे व त्यांची चौकशी सुरू करावी.