नगर रचना’चे निलंबित हनुमंत नाझीरकर ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:12 AM2021-03-24T04:12:02+5:302021-03-24T04:12:02+5:30
पुणे : उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता बाळगल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केलेले नगर रचना विभागाचे निलंंबित सहसंचालक हनुमंत ...
पुणे : उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता बाळगल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केलेले नगर रचना विभागाचे निलंंबित सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांना पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने साताऱ्यामधून ताब्यात घेतले आहे.
नाझीरकर यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्यांच्या अटकेची प्रक्रिया अजून सुरु असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगांवकर यांनी सांगितले.
फळविक्रेत्याचा फळे विक्रीचा सुमारे २ कोटी ९० लाख रुपयांचा खोटा दस्त करारनामा करुन फसवणूक केल्याप्रकरणी नगररचना सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्यासह त्यांची पत्नी संगीता नाझीकर, मुलगी गीतांजली नाझीरकर, मुलगा भास्कर नाझीरकर अशा ६ जणांवर बारामती पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणात २१ मार्च रोजी ग्रामीण पोलिसांनी भास्कर नाझीरकर याला अटक केली होती.
त्याअगोदर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने उत्पन्नापेक्षा २ कोटी ७५ लाख रुपयांची अधिक संपत्ती आढळून आल्याने नाझीरकर यांच्याविरुद्ध जून २०२० मध्ये अलंकार पोलीस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. त्याची माहिती नगर विकास विभागाला कळविल्यानंतर तब्बल ९ महिन्यांनंतर नगर विकास विभागाने १० मार्च २०२१ रोजी हनुमंत नाझीरकर यांना निलंबित केले आहे. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा वेगाने शोध घेण्यास सुरुवात केली. ग्रामीण पोलीस दलाच्या गन्हे अन्वेषण विभागाला ते सातारा येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर आज त्यांना तेथून ताब्यात घेण्यात आले आहे.