निलंबित नगररचना सहसंचालक हनमुंत नाझीरकर यांच्या भाच्याचा जामीन अर्ज फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 11:55 AM2021-07-02T11:55:41+5:302021-07-02T14:33:54+5:30
जामीन मिळावा असा अर्ज भाचा राहुल खोमणे याच्या वतीने न्यायालयात करण्यात आला होता
पुणे: गेले १०० हून दिवस येरवडा कारागृहात असलेल्या निलंबित नगररचना सहसंचालक हनुमंत नाझीरकर याचा भाचा राहुल खोमणे याचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळून लावला.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने हनुमंत नाझीरकर याच्यासह ८ जणांविरुद्ध नुकतेच दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले आहे. त्यात त्यांनी ८२ कोटी रुपयांची अपसंपदा बाळगल्याचा आरोप आहे. हे दोषारोपपत्र ९१ व्या दिवशी सादर केल्याने आपल्याला जामीन मिळावा, असा अर्ज राहुल खोमणे याच्या वतीने न्यायालयात करण्यात आला होता. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक गिरीश सोनवणे यांनी त्याबाबत न्यायालयात यापूर्वी उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालयाचे निवाड्याचा उल्लेख नमूद करुन हा जामीन अर्ज फेटाळण्याची विनंती केली.
सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी सांगितले की, राहुल शिवाजी खोमणे (वय ३१, रा. शिरवली, ता. बारामती) याला २४ मार्च रोजी अटक करुन २५ मार्च रोजी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने प्रथम १ एप्रिल व नंतर ७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली होती. ७ एप्रिलपासून आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे. त्यांच्यावर २४ जून रोजी सकाळी १० वाजून ३५ मिनिटांनी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले आहे. खोमणे हा मार्चचे ७ दिवस एप्रिलचे २९ दिवस, मे ३१ दिवस व आरोपीने २३ जून रोजी जामीनासाठी (डिफॉल्ट बेल) अर्ज केला आहे. जूनचे २३ दिवस अशी गणना करता आरोपीने ९० दिवस पूर्ण न होताच मूदतपूर्व अर्ज केलेला आहे.
यश पाल गुप्ता विरुद्ध पंजाब सरकार व इतर या केसमधील उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारे आरोपीवर ९१ व्या दिवशी न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले आहे. त्यामुळे त्याचा जामीन अर्ज फेटाळावा, असा युक्तीवाद केला. न्यायालयाने तो ग्राह्य धरुन जामीन अर्ज फेटाळला. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या इतिहासातील हा सर्वात मोठ्या अपसंपदा खटला आहे. त्याचबरोबर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या गुन्ह्यात इतका काळ न्यायालयीन कोठडीत असलेला हा बहुदा पहिलाच गुन्हा आहे. या जामीन अर्जावरील सुनावणीला न्यायालयात मोठी गर्दी झाली होती.