शिवीगाळ करणारा उपनिरीक्षक निलंबित
By Admin | Published: April 11, 2017 03:56 AM2017-04-11T03:56:02+5:302017-04-11T03:56:02+5:30
रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवून देण्यासाठी; तसेच कारवाई न करण्यासाठी हप्त्याची मागणी करीत हॉटेलचालकाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत धमकावणाऱ्या
पुणे : रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवून देण्यासाठी; तसेच कारवाई न करण्यासाठी हप्त्याची मागणी करीत हॉटेलचालकाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत धमकावणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक विलास गुजर यांना पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला आणि सह पोलीस आयुक्त सुनील रामानंद यांनी निलंबित केले आहे.
लष्कर भागातील एम. जी. रस्त्यावरच्या एका हॉटेलचालकाकडे गुजर मागील काही दिवसांपासून दरमहा हप्त्यांची मागणी करीत होते; मात्र हॉटेलचालकाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही, असे दिसताच कारवाईसाठी हॉटेलवर गेलेल्या गुजर यांनी मालकाला फोन करून शिवीगाळ करीत धमकवायला सुरुवात केली होती. अर्वाच्च भाषेतील या शिव्या खाऊनही हॉटेल -चालक त्याला पैसे देण्यास तयार आहे, असे वारंवार सांगत असतानाही ‘पोलीस आयुक्त, सह आयुक्त कोणालाही जाऊन सांग, मी पैसे मागितले’ अशी मग्रुरी त्यांनी दाखवली. माझ्या सोबतच्या दुसऱ्या अधिकाऱ्यांना पैसे देतोस, कर्मचाऱ्यांना पैसे देतोस, मला का देत नाहीस, असे दरडावून विचारत दमात घेण्याचा प्रयत्न केला होता.
या संपूर्ण संभाषणाच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालेल्या दोन आॅडिओ क्लिप्स ‘लोकमत’च्या हाती लागल्या होत्या. यासंदर्भात सोमवारच्या अंकात सविस्तर वृत्त प्रसिद्ध होताच पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी परिमंडल दोनचे उपायुक्त पंकज डहाणे यांना चौकशीचे आदेश दिले. डहाणे यांनी लष्कर विभागाचे सहायक आयुक्त नीलेश मोरे यांना चौकशी करून एक दिवसाच्या आतमध्ये पोलीस आयुक्तांना अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार, आॅडिओ क्लिपसह अन्य बाबींची चौकशी करून त्यांनी वरिष्ठांना अहवाल सादर केला. या अहवालामध्ये गुजर यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. पोलीस आयुक्त आणि सह आयुक्तांनी याबाबत निर्णय घेऊन गुजर यांना निलंबित केले आहे. सोमवारी संध्याकाळी याबाबतचे आदेश देण्यात आले.
लष्कर पोलीस ठाण्याच्या सेंट्रल स्ट्रीट पोलीस चौकीमध्ये नेमणुकीस असलेल्या गुजर यांच्या अरेरावीबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच त्याची आयुक्त शुक्ला आणि सह आयुक्त रामानंद यांनी गंभीर दखल घेत २४ तासांच्या आतमध्ये ही कारवाई केली.