Pune Vidhan Sabha: कसबा, पुणे कॅन्टोन्मेंट, खडकवासल्यातील सस्पेन्स कायम; इच्छुकांचे जीव टांगणीला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 12:48 PM2024-10-21T12:48:48+5:302024-10-21T12:49:15+5:30

पुणे कॅन्टोन्मेंट, खडकवासला येथील आमदारांना पक्षांतर्गत विरोध तर कसब्यातून दोन जण इच्छुक

Suspense continues in Kasba Pune Cantonment Khadakwasla The lives of the aspirants hang on the line | Pune Vidhan Sabha: कसबा, पुणे कॅन्टोन्मेंट, खडकवासल्यातील सस्पेन्स कायम; इच्छुकांचे जीव टांगणीला

Pune Vidhan Sabha: कसबा, पुणे कॅन्टोन्मेंट, खडकवासल्यातील सस्पेन्स कायम; इच्छुकांचे जीव टांगणीला

पुणे: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने ९९ उमेदवारांची पहिली यादी रविवारी जाहीर केली आहे. त्यामध्ये पुणे शहरातील कोथरूडमध्ये ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील, शिवाजीनगरमध्ये सिद्धार्थ शिरोळे, पर्वतीमध्ये माधुरी मिसाळ तर पिंपरीतील भोसरी मतदारसंघातून महेश लांडगे आणि ग्रामीणमध्ये दौंड मतदारसंघातून राहुल कुल या विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीनंतर आमदार झालेल्या अश्विनी जगताप यांना तिकीट न देता, त्यांचे दीर शंकर जगताप यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे, कसबा, पुणे कॅन्टोन्मेंट आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघातील सस्पेन्स कायम आहे. अद्याप उमेदवारी जाहीर न झाल्याने इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे.

कोथरूड मतदारसंघातून भाजपचे ज्येष्ठ नेते, मंत्री चंद्रकांत पाटील हे दुसऱ्यांदा रिंगणात आहेत. तर शिवाजीनगरमध्ये भाजपने पुन्हा सिद्धार्थ शिरोळे यांच्यावर विश्वास दाखवला आहे. पर्वती विधानसभा मतदारसंघामधून सलग तीन वेळा निवडून आलेल्या माधुरी मिसाळ यांना भाजपने चौथ्यांदा संधी दिली आहे.

इच्छुकांचे जीव टांगणीला

पुणे शहरात आठ विधानसभा मतदारसंघ असून जागावाटपामध्ये महायुतीत भाजपला कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट, खडकवासला आणि कसबा हे सहा मतदारसंघ आहेत. तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे वडगाव शेरी, हडपसर मतदारसंघ आहेत. भाजपने अद्याप पुणे कॅन्टोन्मेंट, खडकवासला आणि कसबा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले नाहीत. त्यापैकी पुणे कॅन्टोन्मेंट, खडकवासला येथे भाजपचे विद्यमान आमदार आहेत. मात्र, त्यांना उमेदवारी देण्यावरून पक्षांतर्गत विरोध आहे. कसबा मतदारसंघामध्ये भाजपचे हेमंत रासने, धीरज घाटे हे इच्छुक आहेत. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात ब्राह्मण उमेदवार द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास २९ ऑक्टोबर आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ४ नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तीन विद्यमान उमेदवारांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पर्वतीमधील इच्छुक माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, राजेंद्र शिळीमकर हे इच्छुक काय भूमिका घेतात? याकडे लक्ष लागले आहे.

दोन दिवसांत घेणार निर्णय

पर्वती विधानसभा मतदारसंघातून मी उमेदवारी मागितली होती; पण मला पक्षाने उमेदवारी दिलेली नाही. त्यामुळे मी नाराज आहे. पक्षांचे कार्यकर्ते आणि मतदार यांच्याशी चर्चा करून दोन दिवसांत निवडणुकीबाबत निर्णय घेणार आहे, असे श्रीनाथ भीमाले यांनी सांगितले.

Web Title: Suspense continues in Kasba Pune Cantonment Khadakwasla The lives of the aspirants hang on the line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.