फार्महाऊसवरील 'डान्स पार्टी' भोवली; पुणे महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 07:46 PM2021-04-30T19:46:39+5:302021-04-30T19:48:09+5:30
राज्यात लॉकडाऊन असतानाही मुंबईहून बारगर्ल आणत फार्महाऊसवर केलेल्या 'डान्स पार्टी'ची दखल
पुणे : राज्यात लॉकडाऊन असतानाही मुंबईहून बारगर्ल आणत त्यांच्यासोबत फार्महाऊसवर केलेल्या 'डान्स पार्टी'ची गंभीर दखल पालिका प्रशासनाने घेतली आहे. या पार्टीचे आयोजन करून बाराबालांसोबत थिरकणाऱ्या पालिकेच्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.
तसेच पार्टीतील सहभागी ठेकेदारांनी केलेल्या कामांची गुणवत्ता तसेच प्रत्यक्षात कामे झाली आहेत की नाही याची दक्षता समितीमार्फत बारकाईने तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली.
कुडजे गावातील लबडे फार्महाऊसवर पालिकेतील 'रिंग मास्टर' ठेकेदार आणि एक अधिकारी पोलिसांच्या छाप्यात पकडले गेले. पोलिसांनी मंगेश राजेंद्र शहाणे (वय ३२, रा. संतनगर, अरण्येश्वर), ध्वनीत समीर राजपुत (वय २५), निखील सुनिल पवार (वय ३३, रा. पर्वती दर्शन), समीर उर्फ निकेश दिलीप पायगुडे (वय ३९, रा. आगळंबे फाटा, कुडे गाव, ता. हवेली), विवेकानंद विष्णु बडे (वय ४२, रा. नवी सांगवी), प्राजक्ता मुकुंद जाधव (वय २६, रा. मिलिंदनगर, सांताक्रुझ, मुंबई), निलेश उत्तमराव बोधले (वय २९, दोघेही रा. पुरंदर हाऊसिंग सासोयटी, म्हाडा कॉलनी), सुजित किरण आंबवले (वय ३४, रा. बालाजीनगर) आणि आदित्य संजय मदने (वय २४, रा. अंधेरी पुर्व, मुंबई) यांना अटक केली. तर, फार्म हाऊस व्यवस्थापक पायगुडे, पार्टीचे आयोजन करणारा अधिकारी विवेकानंद बडे आणि डान्सर मुलींना घेऊन येणारी प्राजक्ता जाधव यांना न्यायालयाने ३ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. इतर आरोपींची जामीनावर सुटका केली आहे.
अटक झालेल्यांपैकी बहुतांश जण हे पुणे महापालिकेतील ठेकेदार आहेत. यामध्ये भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर, विवेकानंद बडे हा पालिकेच्या सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयामध्ये कनिष्ठ अभियंता आहे. या सर्वांवर कारवाई केली जाणार आहे. बडे आणि ठेकेदारांमध्ये नेमके काय संबंध आहेत, त्यांनी ठेकेदारांची बिले देण्यास मदत केली आहे काय याचीही चौकशी केली जाणार असल्याचे डॉ. खेमनार यांनी सांगितले.
----
अभियंता विनायक बडे याला निलंबित करण्यात आले आहे. हा प्रकार गंभीर आहे. पकडले गेलेले ठेकेदार आणि बडे यांच्यातील संबंध नेमके काय आहेत हे तपासण्यात येणार आहे. बडे याची विभागीय चौकशी केली जाणार आहे. ठेकेदारांनी केलेल्या कामांची देखील तपासणी केली जाणार आहे. ही कामे खरोखरीच झाली आहेत का, झालेल्या कामांची तपासणी कोणी केली होती, कोणत्या अधिकाऱ्यांनी सह्या दिल्या होत्या हे सर्व बारकाईने तपासले जाणार आहे.
- डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, पुणे महानगरपालिका