बारामतीत कनिष्ठ अभियंत्यावर निलंबनाची कारवाई; महावितरणचा ५ लाखांचा महसूल बुडवला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 08:29 PM2023-01-18T20:29:28+5:302023-01-18T21:31:46+5:30
अभियंत्याने जवळपास ६३ ग्राहकांचे अर्ज दाबून ठेवले असून त्यांना कनेक्शनही दिले नाही
बारामती: वीज ग्राहकांना महावितरणची सेवा देण्यासाठी दुर्लक्ष करणे महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्याला चांगलेच महागात पडले आहे. वीज कनेक्शन देण्यास हयगय व अर्ज दाबून ठेवणाºया सुपे येथील कनिष्ठ अभियंत्यावर महावितरणने निलंबनाची कारवाई केली आहे.
बारामती येथील कार्यकारी अभियंता यांनी ही कारवाई केली आहे.अर्ज केला तरी कनेक्शन मिळत नाही, भेटायला आल्यास अभियंता गायब असतात अशा अनेक तक्रारी गेल्या काही महिन्यांपासून सुपे येथील वीज ग्राहकांनी केल्या होत्या. त्याबाबत संबंधित अभियंता अभिषेक पुंडलिक मडावी यांना वेळोवेळी कारणे दाखवा नोटीस व आरोप पत्र देऊन ५१ हजारांचा दंड सुद्धा ठोठावण्यात आला. मात्र तरीही कामात कसलीही सुधारणा झाली नाही. त्यामुळे बारामती विभागीय कार्यालयाने मडावी यांचेवर बुधवारी (दि. १८) निलंबनाची कारवाई करण्यात आली. निलंबन काळात मडावी यांना वालचंदनगर उपविभागीय कार्यालयात हजेरी लावावी लागेल. तसेच पूर्व परवानगी शिवाय मुख्यालय सोडून जाता येणार नाही.
सध्या महावितरण कंपनी शेतकरी मेळावे घेऊन शेतीपंपाला कनेक्शन देत आहे. मात्र सुपे येथील अभियंता मडावी यांनी जवळपास ६३ ग्राहकांचे अर्ज दाबून ठेवले. त्यांना कनेक्शन दिले नाही. त्यांच्यामुळे कंपनीचा सुमारे ५ लाख १३ हजारांचा महसूल बुडाला. त्यांच्या कामाबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे अनेक तक्रारी येत होत्या. जेव्हा वरिष्ठांनी ११ जानेवारी २०२३ रोजी सुपा येथे ग्राहक मेळावा घेतला. तेंव्हा अनेक ग्राहकांनी महावितरणकडे मडावी यांच्या कामाच्या तक्रारींचा पाढाच वाचला. या मेळाव्याला हजर राहण्याचे सौजन्य सुद्धा त्यांनी दाखविले नाही. तसेच गेल्या अनेक दिवसांपासून ते कोणत्याही रजेशिवाय गैरहजर आहेत. परिणामी वरिष्ठांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. या कारवाईचे नागरिकांतून स्वागत होत आहे.
याबाबत कार्यकारी अभियंता गणेश लटपटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले कि, ग्राहकसेवेप्रती कर्तव्यात कसूर करणाºयांची गय केली जाणार नाहि. महावितरण ग्राहकांच्या प्रति दक्ष आहे.ग्राहकाच्या सेवेत अनिमियतता. कर्तव्यात कसुर केल्याने अभिषेक मडावी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.त्यांची तातडीने चौकशी सुरु करण्यात आली आहे.महावितरण ग्राहक हिताबाबत तडजोड करणार नाहि. चौकशी पुर्ण होईपर्यंत ते कायम निलंबित राहतील.पुढील अंतिम निर्णय होईल,असे लटपटे म्हणाले.