‘मालधक्का बंद’च्या आंदोलनाला स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 12:59 AM2017-12-28T00:59:32+5:302017-12-28T00:59:37+5:30
पुणे : कोणतीही कल्पना न देता बंद करण्यात आलेला पुणे रेल्वेस्टेशन येथील मालधक्का पुन्हा सुरू करावा, या मागणीसाठी १५ दिवसांपासून हमाल संघटना व हुंडेकरी असोसिएशनने सुरू ठेवलेले ‘धरणे आंदोलन’ खासदार अनिल शिरोळे यांच्या आश्वासनानंतर, स्थगित करण्यात आले;
पुणे : कोणतीही कल्पना न देता बंद करण्यात आलेला पुणे रेल्वेस्टेशन येथील मालधक्का पुन्हा सुरू करावा, या मागणीसाठी १५ दिवसांपासून हमाल संघटना व हुंडेकरी असोसिएशनने सुरू ठेवलेले ‘धरणे आंदोलन’ खासदार अनिल शिरोळे यांच्या आश्वासनानंतर, स्थगित करण्यात आले; परंतु महिनाभरात यावर मार्ग न निघाल्यास निर्णायक स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असे हमाल पंचायत, ट्रान्स्पोर्ट व डॉक वर्कर्स युनियन व हुंडेकरी असोसिएशन आदी संघटनांनी जाहीर केले.
रेल्वे प्रशासनाच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ व मालधक्का पुन्हा सुरू करण्याच्या मूळ मागणीसाठी विविध संघटनांनी ११ डिसेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते; तसेच बाजार बंद ठेवून विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयावरही मोर्चा काढण्यात आला; मात्र रेल्वे प्रशासनाने आडमुठी भूमिका कायम ठेवली; परंतु रेल्वे व्यवस्थापक कार्यालयासमोरील सभेत आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी घेण्यात आलेल्या सभेला खासदार अनिल शिरोळे यांनी हजेरी लावली. याप्रसंगी डॉ. बाबा आढाव, नितीन पवार, राजेंद्र तरवडे, सुहास जोशी उपस्थित होते.
कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता व पूर्वकल्पना न देता मालधक्का बंद करण्याचा निर्णय योग्य नाही. हे चांगल्या प्रशासनाचेही लक्षण नाही. त्यामुळे हा विषय रेल्वे मंत्र्यांपर्यंत घेऊन गेलो आहे, असे शिरोळे यांनी सांगितले; तसेच प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून, रेल्वे व मनपा प्रशासनाची संयुक्त बैठक घेतली जाणार आहे. त्यामुळे हा प्रश्न सोडविण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे. त्यामुळे आंदोलन तूर्तास थांबवावे, असेही शिरोळे म्हणाले. दरम्यान, विभागीय व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांनी आंदोलकांच्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा केली. रेल्वे ट्रॅकजवळील झोपड्या काढण्यासाठी आम्ही युद्धपातळीवर प्रयत्न करीत असून, पालिका व पोलीस प्रशासन यांच्या संपर्कात आहोत. पोलीस बंदोबस्तासाठी पैसेही भरले आहेत, असे देऊस्कर यांनी सांगितले. मालधक्का बंदच करण्याचा कोणताही विचार नसून अतिक्रमण काढून ट्रॅकची डागडुजी करून मालधक्का पुन्हा सुरू करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.