वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक दत्तात्रय वारे गुरुजींचे निलंबन अखेर मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 01:27 PM2022-02-02T13:27:57+5:302022-02-02T13:30:22+5:30
कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण केल्यावर वारे गुरुजी पुन्हा शाळेत रुजू होणार आहेत
पुणे : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळात सदस्यांच्या मागणीमुळे वाबळेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक दत्तात्रय वारे गुरुजी यांना दोन महिन्यांपूर्वी निलंबित करण्यात आले होते. मंगळवारी निलंबन समितीच्या बैठकीत वारे गुरुजी यांच्यावरील आरोपांची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगत त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले. कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण केल्यावर वारे गुरुजी पुन्हा शाळेत रुजू होणार आहेत.
वाबळेवारी येथील जिल्हा परिषदेची आंतराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेल्या शाळेत स्थानिक मुलांना अॅडमिशन दिल्या जात नाही, तसेच डोनेशन घेऊन बाहेरील मुलांना प्रवेश दिला जातो. तसेच देणग्यांमध्ये अनियमितता असल्याचे सांगत जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत वारे गुरुजींच्या निलंबनाची मागणी सदस्यांनी लावून धरली होती. एवढेच नाही तर चौकशी समिती स्थापन करण्यात यावी, अशी मागणीही सदस्यांनी केली होती. सदस्यांच्या भावना लक्षात घेता दत्तात्रय वारे यांना निलंबित करण्यात आले होते. त्यांच्यावर चौकशी समितीही बसविण्यात आली होती. या चौकशीचा अहवाल आयुक्तांपुढे सादर करण्यात आला असून आयुक्त पातळीवर सध्या चर्चा सुरू आहे.
दोषारोपण सादर केल्यावर वारे यांच्याकडून उत्तर मागण्यात आले होते. त्यावर त्यांनी उत्तर दिले, त्यानुसार जिल्हा परिषदेत मंगळवारी झालेल्या सभेत त्यांचे निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्यांना पुन्हा सेवेत रुजू केले जाणार आहे. वारे यांना पुन्हा रुजू करून घेतल्याने त्यांचे निलंबन योग्य होते का, असा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. विभागीय आयुक्तपातळीवर चर्चा सुरू असताना तसेच त्यांचा अहवाल अद्याप येणे बाकी असताना निलंबन मागे घेतल्याने शैक्षणिक क्षेत्रात चर्चा सुरू आहे. त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप हे राजकीय आकसापोटी होते का, असा प्रश्नही जिल्हा परिषदेच्या वर्तुळात विचारला जात आहे.
एखाद्याला निलंबित केल्यावर त्याला दोषारोप पत्र दिले जाते. या संदर्भात त्यांना खुलासा मागितला जातो. वारे गुरुजींनी या प्रकरणी खुलासा सादर केला आहे. त्यांनी आरोप मान्य न केल्याने त्यांची विभागीय स्तरावर चौकशी सुरू आहे. दरम्यानच्या काळात त्यांना शासकीय नियमानुसार सेवेत रुजू करुन घेतल्या जाऊ शकते, त्यानुसार त्यांचे निलंबन मागे घेतले आहे.
-कमलाकर रणदिवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, प्रशासन विभाग