वेळेत काम न केल्यास अधिकाऱ्यांचे निलंबन
By admin | Published: July 16, 2016 01:19 AM2016-07-16T01:19:46+5:302016-07-16T01:19:46+5:30
सिंहगड रस्त्यावरील विश्रांतीनगर ते सिंहगड कॉलेज या रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी अधिकारी काम करीत नसल्यामुळे होत आहे
पुणे : सिंहगड रस्त्यावरील विश्रांतीनगर ते सिंहगड कॉलेज या रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी अधिकारी काम करीत नसल्यामुळे होत आहे. रस्तारुंदीकरणासाठी लागणाऱ्या जागेचे संपादन येत्या १० आॅगस्टपर्यंत झाले नाही, तर संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असे आदेश आयुक्त कुणाल कुमार यांनी दिले. काम पूर्ण करून घेण्याची जबाबदारी आयुक्तांनी पालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर सोपविली आहे.
या रस्त्याच्यासंदर्भात स्थानिक नगरसेविका मंजूषा नागपुरे गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न करीत आहे. वर्षभरापूर्वी पालकमंत्री गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ यांनी याबाबत अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली होती, मात्र त्यानंतर काहीच हालचाल झाली नाही. त्यामुळे नागपुरे यांनी आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर शुक्रवारी त्याबाबत बैठक झाली. शहर अभियंता प्रशांत वाघमारे, पथ विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र राऊत, तसेच नागपुरे, सामाजिक कार्यकर्ते दीपक नागपुरे, स्थानिक नागरिक मिलिंद पवार, अंजली जोशी, भारती भांबरे, सतीश वाघोलीकर, सुधाकर माडगे आदी बैठकीला उपस्थित होते. वर्षभरापूर्वी झालेल्या बैठकीतील चर्चेचा मागोवा घेण्यात आला असता एकही काम झाले नसल्याचे निदर्शनास आले.
नगरसेविका नागपुरे यांनी सांगितले, की विकास आराखड्यात हा रस्ता तब्बल १८ मीटरचा दर्शविण्यात आला आहे. प्रत्यक्षात त्याची सध्याची रुंदी आठ मीटरपेक्षाही कमी आहे. प्रशासनाला वारंवार सांगितल्यानंतरही रस्ता रुंद करण्याबाबत काही होत नाही, ही खेदाची बाब आहे. बैठकीत वाघमारे तसेच राऊत यांनीही अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेबाबत नाराजी व्यक्त केली. नागपुरे यांनी नंतर आयुक्तांना बैठकीची माहिती दिली, त्यावर त्यांनी १० आॅगस्टची मुदत देऊन तोपर्यंत काम झाले नाही तर संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात येईल, असे सांगितले.
या वेळी पालिका आयुक्तांनी शहर अभियंता व पथ विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली दहा आॅगस्टपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण करण्याची सूचना केली. रस्त्याचे रुंदीकरण वेळेत पूर्ण न केल्यास संबंधितावर कारवाई करण्याचा इशारा या वेळी आयुक्तांनी दिला. या बैठकीला भाजपाचे दीपक नागपुरे, अॅड. मिलिंद पवार, अंजली जोशी, भारती भांबरे, सतीश वाघोलीकर, सुधाकर मांडगे आदी उपस्थित होते.