विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या शिक्षकाचे निलंबन ; जिवे मारण्याचा गुन्हा दाखल करण्याची मनविसेची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 06:56 PM2018-11-12T18:56:29+5:302018-11-12T18:58:34+5:30
सहावीतील विद्यार्थ्याला जबर मारहाण करणाऱ्या शिक्षकाचे केवळ निलंबन न करता त्याच्यावर जिवे मारण्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मनविसेकडून करण्यात अाली अाहे.
पुणे : सहावीतील विद्यार्थ्याने चित्रकलेच्या शिक्षकाने दिवाळी पूर्वीचा अभ्यास म्हणून सांगितलेली चित्रे काढली नाही म्हणून विद्यार्थ्याला मारहाण केली हाेती. या मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका अाल्याचा अाराेप पालकांनी केला अाहे. या प्रकरणी शाळेने शिक्षकाला निलंबित केले अाहे. परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनविसे) शिक्षकावर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात अाली अाहे. अन्यथा मनसे स्टाईल अांदाेलन करण्याचा इशारा दिला अाहे.
पुण्यातील एसएसपीएमएस श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलीटरी स्कूल या शाळेतील प्रसन्न पाटील याचे चित्रकलेचे शिक्षक संदीप गाडे यांनी दाेन चित्रे काढून अाणण्याचा गृहपाठ दिला हाेता. ताे प्रसन्नने न केल्याने गाडे यांनी त्याला बेंचवर हात ठेवण्यात सांगून त्याच्या चेहऱ्यावर तसेच पाेटावर मारहाण केली. या मारहाणीमुळे प्रसन्नचा चेहरा वाकडा झाला. प्रसन्न हा शाळेच्या वसतिगृहात राहताे. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये घरी गेल्यानंतर त्याच्या पालकांना त्याच्या चेहऱ्यात बदल झाल्याचे जाणवले. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस अाला.
दरम्यान, शाळेत असतानाच विद्यार्थ्याला त्रास होत होता. मात्र, शाळा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले असा आरोपही पालकांनी केला आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता पाटील यांच्याकडून या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी पालक आज शाळेत दाखल झाले आहेत. याबाबत गुन्हा दाखल करणार असल्याचे पालकांनी स्पष्ट केले आहे.
शाळेने गाडे यांचे निलंबन केले असून या प्रकरणाची चाैकशी करण्यासाठी समिती नेमण्यात अाल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता पाटील यांनी सांगितले. तसेच समितीचा अहवाल अाल्यानंतर समितीच्या निर्देशानुसार गाडे यांच्यावर कारवाई करण्यात येईल असेही पाटील यांनी सांगितले.