मोठी बातमी! आरोग्य विभागाचा गट ‘क’ परीक्षेचा पेपर फुटल्याचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 08:39 PM2021-12-08T20:39:20+5:302021-12-08T20:41:29+5:30
पेपर फोडण्याची कार्यपद्धती लक्षात घेता गट ‘क’चाही पेपर फुटला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून त्याची चौकशी केल्यास...!
पुणे :आरोग्य विभागाचा गट ‘ड’ परीक्षेचा पेपर मुंबईतील आरोग्य संचालयनालयातून वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत फोडण्यात आल्याचे पुणे सायबर पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाल्यानंतर आता २४ ऑक्टोबर रोजी झालेल्या गट ‘क’ परीक्षेचाही पेपर फुटल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
आरोग्य विभागाच्या या मेगा भरतीच्या परीक्षेच्या गैरव्यवस्थेवरून परीक्षेच्या अगोदर चारही बाजूने टीका होत होती. मात्र, तरीही ही परीक्षा तशीच राबविण्यात आली. त्यातून पुढे ‘ड’ परीक्षेचा पेपर फुटल्याचा गवगवा झाला. मात्र, गट ‘क’च्या पेपरविषयी काही माहिती पुढे आली नाही. पेपर फोडण्याची कार्यपद्धती लक्षात घेता गट ‘क’चाही पेपर फुटला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून त्याची चौकशी केल्यास त्यातील घोटाळा समोर येऊ शकेल, असे सूत्रांनी सांगितले.
अशी होती पेपर फोडण्याची कार्यपद्धती-
वरिष्ठ अधिकार्यांनी हे पेपर फोडून ते कनिष्ठ अधिकारी व एजंटांना दिले. त्यांनी क्लास चालकांपर्यंत ते पोहचविले. पेपरमधील प्रश्न आणि उत्तरे हे क्लास चालकांनी परिक्षार्थींना सांगून त्यांच्याकडून प्रश्न आणि त्यांची उत्तरे ही पाठ करून घेतली होती. कोणालाही पेपर दिला नव्हता. मात्र, ज्यासाठी आपण लाखो रुपये देणार आहोत, तो पेपर खरा आहे का याची खात्री करण्यासाठी या तिसऱ्या, चौथ्या फळीतील एजंट, क्लासचालकांनी तो व्हाटसॲपवर पाठविला. त्यातून तो व्हायरल झाला आणि पेपर फुटीचा प्रकार समोर आला. अशाच प्रकारे गट ‘क’ परिक्षेचा पेपरही फुटला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.