हडपसरला 15 कुत्र्यांचा संशयास्पद मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 12:48 PM2018-06-17T12:48:40+5:302018-06-17T15:20:43+5:30
हडपसर येथील म्हाडा काॅलनीजवळ 15 कुत्री मृतावस्थेत अाढळली असून त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप कळू शकले नाही.
पुणे : हडपसर येथील म्हाडा काॅलनीजवळ 15 भटकी कुत्री मृतावस्थेत सापडल्याने शहरात एकच खळबळ उडाली अाहे. इतकी कुत्री एकत्र मृतावस्थेत सापडल्याने त्यांना अन्नातून विष दिल्याचा संशय व्यक्त करण्यात येत अाहे. याप्रकरणी महापालिकेच्या अाराेग्य विभागाने हडपसर पाेलिसांकडे तक्रार दिली असून हडपसर पाेलीस अधिक तपास करीत अाहेत.
शनिवारी म्हाडा काॅलनीच्या परिसरात भटकी कुत्री मृतावस्थेत पडल्याची माहिती नागरिकांनी महापालिकेच्या अाराेग्य विभागाला दिली. अाराेग्य विभागाकडून या घटनेची माहिती हडपसर पाेलिसांना देण्यात आली. अाराेग्य विभागातील कर्मचारी, पाेलीस उपनिरीक्षक व्ही. के. झंझाड यांनी घटनास्थळी भेट दिली. मृतावस्थेत सापडलेल्या कुत्र्यांचे अाैंध येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार अाहे. याबाबतचा वैद्यकीय अहवाल अाज(रविवार) मिळण्याची शक्यता अाहे. त्यानंतर पाेलीसांकडून गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती हडपसर पाेलिसांकडून देण्यात अाली अाहे.
पुणे शहर अाणि परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या माेठ्याप्रमाणावर वाढली अाहे. रात्रीच्या वेळी ही भटकी कुत्री चाैका-चाैकांमध्ये थांबून दुचाकी चालकांच्या मागे लागत असतात. त्यामुळे अनेक अपघातही झाले अाहेत. त्याचबराेबर लहान मुलांना या भटक्या कुत्र्यांनी गंभीर जखमी केल्याची अनेक प्रकरणे समाेर अाली हाेती. सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या लेखिका मंगला गाेडबाेले यांनाही भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याचे प्रकरण ताजे अाहे. महापालिकेकडून या कुत्र्यांवर नसबंदी करण्यात येत असली तरी त्याचे प्रमाण कमी असल्याने या कुत्र्यांची संख्या वाढत चालली अाहे. त्यामुळे या भटक्या कुत्र्यांच्या उच्छादाला कंटाळून त्यांना अन्नातून विष देऊन मारल्याचा संशय व्यक्त करण्यात येत अाहे.