उरुळीकांचन हद्दीत एका महिलेसह दोघांचा संशयास्पद मृत्यू, शवविच्छेदनाशिवाय तातडीने केले अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 10:18 PM2020-08-20T22:18:56+5:302020-08-20T22:19:40+5:30
दोघांच्याही मृत्युबद्दल परिसरात संशयाचे वातावरण निर्माण
पुणे (उरुळी कांचन) :- उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरात मागील दहा दिवसांच्या कालावधीत, दोन वेगवेगळ्या घटनेत एका तीस वर्षीय महिलेसह दोघांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. वरील दोन्ही घटनेत मृतांच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या परस्पर दोघांवर शवविच्छेदनाशिवाय तातडीने अंत्यसंस्कार केल्याने, दोघांच्याही मृत्युबद्दल परिसरात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन येथील एका बड्या व्यापाऱ्याच्या टिळेकरवाडी खामगांव टेक परिसरातील शेतामधील कडबा कुट्टी मशिन चालु करण्यासाठी गेलेल्या एका पस्तीस वर्षीय मजुराचा विजेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यु झाला होता. कामगाराचा मृत्यु नैसर्गिक नसल्याने,घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना देणे कायद्याने बंधनकारक होते. मात्र व्यापाऱ्याच्या नातेवाईकांनी मृताच्या नातेवाईकांना तोंडी कल्पना देऊन, पोलिसांच्या परस्पर तेही शवविच्छेद न करता संबधित व्यक्तीवर तातडीने अंत्यसंस्कार केले होते. तर दुसऱ्या घटनेत उरुळी कांचन परिसरातील एका तीस वर्षीय महिलेचा दोन दिवसापुर्वी संशयास्पदरित्या मृत्यु झाला होता. ही माहिती उरुळी कांचन पोलिस चौकीत पोहचण्यापुर्वीच, मृतांच्या नातेवाईकांनी संबंधित तरुणीवर अंत्यसंस्कार केल्याची बाब पुढे आली आहे.
याबाबत महावितरणचे उपकार्यकारी अभियंता प्रदीप सुरवसे म्हणाले, दहा दिवसापुर्वी खामगांव टेक य़ेथे कडबा कुट्टी मशिन चालु करण्यासाठी गेलेल्या एका पस्तीस वर्षीय मजुराचा विजेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यु झाला ही बाब खरी आहे. विजेचा धक्का लागल्याने एकाचा जागीच मृत्यु झाल्याची बाब समजताच, आमचे कर्मचारी जाण्यापुर्वीच संबधित व्यक्तीवर अंत्यसंस्कार झाल्याचे समजले होते. याबाबत तक्रार न आल्याने, ही बाब आम्हीही पोलिसांना कळवली नव्हती.
सहाय्यक पोलिस निरीक्षक पवन चौधरी म्हणाले, उरुळी कांचन परिसरात दहा दिवसाच्या कालावधीत दोन वेगवेगळ्या घटनेत एका तीस वर्षीय महिलेसह दोघांचा संशयास्पद मृत्यु झाल्याची माहिती पोलिसांपर्यंत आली आहे. या घटनांची माहिती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.