सुतारदरा झाला डंपिंग ग्राऊंड
By Admin | Published: May 4, 2017 03:03 AM2017-05-04T03:03:31+5:302017-05-04T03:03:31+5:30
सुतारदरा परिसरात कचरा समस्येने तीव्र रूप धारण केले आहे. स्थानिक कचरा कमी म्हणून की काय येथे बाहेरून हॉटेल, मंगल
कोथरूड : सुतारदरा परिसरात कचरा समस्येने तीव्र रूप धारण केले आहे. स्थानिक कचरा कमी म्हणून की काय येथे बाहेरून हॉटेल, मंगल कार्यालये आदींचा कचरा आणून टाकला जातो. असा कचरा टाकणाऱ्यांना विरोध करणाऱ्यांना मारहाण करण्याचेही प्रकार येथे घडले आहेत. कचऱ्याच्या रोजच्या त्रासाने बेजार झालेले नागरिक ही समस्या सुटणार की नाही, असा प्रश्न संतापाने विचारत आहेत.
कोथरूड हा पुणे शहरातील वेगाने विकसित होणारा भाग म्हणून ओळखला जातो. एकीकडे उच्चभ्रू सोसायट्या, तर दुसरीकडे गरिबांची वस्ती, असा विरोधाभास कोथरूडमध्ये दिसतो. सुतारदरा येथे राहणारे लोक स्वच्छताप्रिय आहेत; परंतु येथे कचरा व्यवस्थापनात महापालिका प्रशासन अपयशी ठरले आहे. घराघरांतून कचरा संकलन करण्याची व्यवस्था सुतारदरा येथे होणे गरजेचे आहे. ती व्यवस्था करणे तर दूरच; पण येथे बाहेरून आलेला कचरा टाकण्यात येतो.
संबंधितांवर कारवाई करण्याची हिंमत महापालिकेचे अधिकारी दाखवत नाही. एका आडमुठ्या अधिकाऱ्याने रस्त्यावरच कंटेनर ठेवल्यामुळे येथील वाहतूककोंडी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कंटेनरबरोबर रस्त्यावर कचरा पडत असतो.
निवडणुकीपूर्वी सांगण्यात आले होते की, मागास म्हणून ओळखला जाणारा सुतारदरा आता पुणेकरांसाठी विकासाचे वेगळे रूप म्हणून नव्या रूपाने पुढे येत आहे. नाव बदलले, पण विकासाची चिन्हे मात्र अजून दिसत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.
(वार्ताहर)
सुतारदरा परिसरातील नागरिकांनी दाखवलेला विश्वास सार्थ करून येथील कचरा समस्या सोडविण्यासाठी आम्ही योजना आखली आहे. घरटी कचरा संकलन व्यवस्था सुरू करावी व बाहेरून येणाऱ्या कचऱ्याच्या गाड्यांवर कडक कायदेशीर कारवाई केल्यास येथील कचरा समस्या नक्कीच सुटेल.
- दीपक मानकर, नगरसेवक
कचरा कंटेनरच करतो स्वागत
सुतारदऱ्यात प्रवेश करण्याच्या मुख्य मार्गावरच कचरा कंटेनर ठेवण्यात आला आहे. तो भररस्त्यात असल्याने लोकांची अडचण झाली आहे. सुतारदरासाठी पर्यायी मार्ग म्हणून झालेल्या नवीन रस्त्यावरदेखील कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत. डोंगराचा भाग पांगलेल्या प्लॅस्टिकच्या कचऱ्याने झाकोळला गेला आहे. शेजारचे किश्किंधानगर व मोकळी जागा म्हणजे कचरा डंपिंग ग्राऊंड झाले आहे.
४सामाजिक कार्यकर्ते संदीप कुंबरे म्हणाले की, कचऱ्यामुळे सुतारदरा परिसराचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिकेने कचरा व्यवस्थापनाची सोय केल्यास नागरिकांची या त्रासातून मुक्तता होईल. आरोग्य अधिकारी व महापालिकेचे अधिकारी उपलब्ध व्यवस्थेचा योग्य वापर करत नसल्यानेच कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
महामार्गालगत कचऱ्याचे साम्राज्य
आंबेगाव बुद्रुक : उरुळीदेवाची आणि फुरसुंगी ग्रामस्थांनी वीस दिवसांपासून शहरातील कचरा टाकण्यासाठी विरोध केल्याने शहारातील कचरा समस्या वाढली आहे. उपनगरांमध्ये कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. कात्रज-देहू महामार्गाच्या कडेला कचराकुंडीचे स्वरूप आले आहे. कचरागाडी येत नसल्यामुळे नागरिकांनी कचरा महामार्गाच्या कडेला टाकल्याचे दिसत आहे. पुणे शहरालगत असलेल्या गावचा कचरा पुणे महापालिका घेत होती. पण, तो आत्ता घेत नसल्याने आंबेगाव बुद्रुक ग्रामपंचयतीला कचरा समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे महामार्गालगत कचरा दिसून येत आहे. प्रशासनाने कचऱ्याची समस्या लवकर सोडवावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
कचराकोंडीच्या कचाट्यात वडगाव शेरी
चंदननगर : फुरसुंगी ग्रामस्थांना शहरातील कचरा टाकू न दिल्यामुळे वडगाव शेरी, कल्याणीनगर, विमाननगर, खराडीत कचराकोंडीच्या कचाट्यात अडकली आहे.
वडगाव शेरीतील जुना-मुंढवा रस्ता, खराडी चौक, बिडीकामगार, तसेच परिसरातील सर्वच ठिकाणचा कचरा उचलला जात नसल्याने वडगाव शेरी परिसर कचऱ्याची समस्या वाढली आहे. फुरसुंगी ग्रामस्थ आंदोलन कधी मागे घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तोपर्यंत हा कचरा टाकायचा कुठे, असा प्रश्न आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना पडला आहे.
या भागातून ओला व सुका कचरा प्रतिदिन १२० टन एवढ्या मोठ्या प्रमाणात गोळा केला जातो. मात्र सध्या कचरा टाकायला जागाच नसल्यामुळे कचरा टाकायचा तरी कुठे, याबाबत निर्णय झालेला नाही.
नगर रस्त्यावरील सध्या ओला कचरा हडपसर येथील अजिंक्य प्रकल्पावर टाकला जातो. तर सुका कचरा रोकेम प्रकल्प रामटेकडी येथे टाकला जातो. सध्या तरी वडगाव शेरी भागातील कचरा हा हडपसर येथील प्रकल्पांवर जात असला, तरी कचराकोंडी मात्र होत आहे.(वार्ताहर)