सुवासिनींनी प्रात:कालापासून मध्यान्हापर्यंत करावे वटवृक्षाचे पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:10 AM2021-06-24T04:10:00+5:302021-06-24T04:10:00+5:30
पुणे : सुवासिनी महिलांनी सौभाग्यवृद्धीसाठी करण्याचे एक व्रत म्हणजे ‘वटपौर्णिमा’. हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणून ...
पुणे : सुवासिनी महिलांनी सौभाग्यवृद्धीसाठी करण्याचे एक व्रत म्हणजे ‘वटपौर्णिमा’. हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणून ‘वटपौर्णिमा’ साजरी केली जाते. गतवषी कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे महिलांना वटवृक्षाचे पूजन करण्यासाठी घराबाहेर पडता आले नाही. उद्या (दि. २४) महिलांकडून आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे आणि सातजन्म हाच पती मिळावा म्हणून वटपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. महिलांनी प्रात:कालापासून मध्यान्हपर्यंत म्हणजे दुपारी २ वाजेपर्यंत वडाची पूजा करावी. मात्र, वृक्षाच्या फांद्या तोडून आणून त्याची पूजा करू नये. वटवृक्षाची पूजा करणे काही कारणाने शक्य न झाल्यास वडाच्या झाडाचे चित्र किंवा गंधाने वडाचे झाड काढून पूजा करावी, असे आवाहन पंचांगकर्ते मोहन दाते यांनी केले आहे.
सावित्रीचा पती सत्यवान वडाच्या झाडाखाली गतप्राण झाला आणि पुन्हा तिथे सजीव झाला. या संकेताला अनुसरून महिला यादिवशी वडाचीच पूजा करतात. त्यासाठी त्या वटवृक्ष असेल त्या ठिकाणी जाऊन वडाच्या मुळाशी पाणी घालतात आणि त्याला प्रदक्षिणा घालून सुताचे वेष्टण करतात. नंतर त्याच्या मुळाशी असलेल्या ब्रह्मदेव, सत्यवान सावित्री, धर्मराज व नारद यांच्या प्रतिमांचे पूजन करतात व प्रार्थना करतात. पूजेनंतर सुवासिनींना सौभाग्यवाण दिले जाते. यामागे काही शास्त्रीय कारणे देखील सांगितली जातात.
ऑक्सिजनचे प्रमाण अधिक
वडाच्या झाडामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण जास्त असल्याने महिलांनी वडाच्या सान्निध्यानात राहणे चांगले असते. त्यामुळे हे व्रत अधिक उपयुक्त ठरते. मात्र, कोरोनाचे संकट अजूनही टळलेले नाही. त्यामुळे महिलांनी वडाच्या झाडापाशी गर्दी न करता वडाच्या झाडाचे चित्र काढून पूजा करावी असा सल्ला दाते यांनी दिला आहे.
-------------------------------
फोटो - वट पौर्णिमा