खडकवासला परिसरातील कुक्कुट पक्ष्यांचे स्वॅब, विष्ठा नमुना तपासणी सुरु, पशुसंवर्धन विभागाची कार्यवाही
By नितीन चौधरी | Updated: February 21, 2025 18:58 IST2025-02-21T18:57:25+5:302025-02-21T18:58:16+5:30
या आजारास कारणीभूत घटकांमध्ये कुक्कुट पक्ष्याचा समावेश असल्याची तसेच दुषित पाण्यातून हा आजार पसरत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती

खडकवासला परिसरातील कुक्कुट पक्ष्यांचे स्वॅब, विष्ठा नमुना तपासणी सुरु, पशुसंवर्धन विभागाची कार्यवाही
पुणे : ‘गुलियन बॅरे सिंड्रोम’ या आजाराच्या प्रादुर्भावाशी कुक्कुट पक्ष्यांचा संबंध असण्याची शक्यता पडताळून पाहण्याच्या केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशानुसार खडकवासला धरण परिसरातील कुक्कुट पक्ष्यांचे क्लोॲकल स्वॅब नमुने, विष्ठा नमुने, पाण्याचे नमुने संकलित करुन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीमध्ये परिक्षणासाठी पाठविण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी दिली.
खडकवासला धरण परिसरात जीबीएस आजाराच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या आजारास कारणीभूत घटकांमध्ये कुक्कुट पक्ष्याचा समावेश असल्याची तसेच दुषित पाण्यातून हा आजार पसरत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यानुसार पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने बाधित क्षेत्रालगत पाण्याचे मुख्य स्रोत असलेल्या खडकवासला धरण परिसरातील ११ कुक्कुट प्रक्षेत्रांना भेट दिली. या प्रक्षेत्रांमधून उत्सर्जित सांडपाणी नजीकच्या पाण्याच्या स्त्रोतात मिसळत नसल्याचे आढळून आले आहे.
नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीकडून प्राप्त झालेल्या तपासणी अहवालानुसार एकूण नमुन्यांपैकी १०६ क्लोॲकल स्वॅब ८९ व कुक्कुट विष्ठा १७ तसेच नमुने (९ प्रक्षेत्रावरील २ कुक्कुट विष्ठा आणि २२ क्लॉॲकल स्वॅब नमुने) कंम्पायलोबॅक्टर जेजूनाय या जिवाणूसाठी सकारात्मक आलेले आहेत. एका प्रक्षेत्रावरील ५ नमुने नोरोव्हायरससाठी सकारात्मक आलेले आहेत.
नॅशनल व्हायरॉलॉजी संस्थेने कुक्कुट प्रक्षेत्रावरील २९ पाणी नमुने तपासले असून त्यापैकी २६ पाणी नमुने कंम्पायलोबॅक्टर जेजूनाय अस्तित्व नकारात्मक आहे आणि उर्वरित ३ नमुने तपासणी सुरु आहे.
कुक्कुट प्रक्षेत्र धारकांनी जैवसुरक्षा सुनिश्चित करावी. व्यक्तिगत स्वच्छता आणि प्रक्षेत्राचे नियमितपणे निर्जंतुकीकरण करावे. कोणतेही कुक्कुट पक्षी उत्सर्जने पाणवठ्यात जाणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना पशुसंवर्धन विभागाने दिल्या आहेत. हा आजार कुक्कुट पक्ष्यांपासून पसरत असल्याच्या चुकीच्या बातम्या येत आहेत. यामुळे कुक्कुट पालकांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला असून नागरिकांमध्ये देखील संभ्रम निर्माण होत आहे.
हा आजार संसर्गजन्य नसल्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. व्यवस्थित शिजवलेले चिकन खाल्ल्यास या जिवाणूचा संसर्ग होत नाही. त्यामुळे चिकन खाण्यास हरकत नाही. - डॉ. प्रवीणकुमार देवरे, पशुसंवर्धन आयुक्त