"कोल्हापूर उत्तरचा विजय जनतेचा कौल नाही..." 'मविआ'च्या विजयावर राजू शेट्टींची पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 01:35 PM2022-04-16T13:35:07+5:302022-04-16T13:53:10+5:30
कोल्हापूर उत्तर विधानसभा निकालावर राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया...
पुणे :कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज होता. यामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार काँग्रेसच्या जयश्री जाधव आणि भाजपचे सत्यजीत कदम यांच्यात लढत झाली. सध्याचे निकालाचे कल पाहिले तर ही निवडणूक जवळपास महाविकास आघाडीने जिंकली आहे. यावर बोलताना स्वाभिमानी पक्षाचे नेते राजू शेट्टी म्हणाले, हा विजय जनतेचा कौल वगैरे काही नाही. आमची या निवडणूकीत भूमिकाच नव्हती. पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना शेट्टी यांनी कोल्हापुरच्या निवडणुकीवर प्रश्न विचारल्यावर प्रतिक्रिया दिली.
पुढे बोलताना शेट्टी म्हणाले, सध्या राज्यात भोंग्यावरून राजकारण सुरू आहे. दुसरीकडे वीज, शेती' विद्यार्थी बेरोजगारी, इंधन दरवाढ याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सध्या राज्यात पातळीहीन राजकारण सुरू आहे. महागाईमुळे सामान्य लोक त्रस्त आहेत. नागरिकांच्या हिताच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करत राजकारण सुरू आहे. शेती मालाला भाव नाही, योग्य नियोजन नाही, डाळी, तेल प्रचंड महागले आहे त्यात भोंगे कसले वाजवता असा प्रश्नही शेट्टी यांनी विचारला आहे.
"राज्य सरकारचा 'या' कारणामुळे पाठिंबा काढला"-
स्वाभिमानी पक्षाने काही दिवसांपूर्वी राज्य सरकारचा पाठिंबा काढल्याचे जाहीर केले होते. याचे कारण सांगताना शेट्टी म्हणाले, 'दोन टप्प्यात एफआरपी हा राज्य सरकारचा निर्णय चुकीचा आहे त्यामुळे स्वाभिमानीने पाठिंबा काढला.'
पोटापाण्याचा धंदा म्हणून मी राजकारण करत नाही. आतापर्यंत बराच अनुभव घेतलाय. आता राज्यात शेतकऱ्यांचा दबावगट तयार करणार आहोत. आम्ही तयार केलेले आमदार आम्हाला सोडतात तर सोडू द्या, अशा गद्दारांना बरोबर ठेवून कधीच काम करणार नाही, असंही शेट्टी म्हणाले.