‘लोकमत’च्या ‘स्वरचैतन्य’ने रसिकांची पाडवा पहाट गोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 02:09 AM2017-10-22T02:09:48+5:302017-10-22T02:09:52+5:30
गुलाबी थंडी... धुक्याची पसरलेली दुलई... मनाला चैतन्यमयी करणाºया स्वरांची मनसोक्त पखरण... आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सतारवादक नीलाद्रीकुमार यांच्या सतारीच्या मंजूळ तारांनी हृदयाच्या छेडल्या गेलेल्या तारा... उस्ताद राशीद खान यांच्या अभिजात ‘स्वरसौंदर्या’चे घडलेले सुखद दर्शन...
पुणे : गुलाबी थंडी... धुक्याची पसरलेली दुलई... मनाला चैतन्यमयी करणा-या स्वरांची मनसोक्त पखरण... आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सतारवादक नीलाद्रीकुमार यांच्या सतारीच्या मंजूळ तारांनी हृदयाच्या छेडल्या गेलेल्या तारा... उस्ताद राशीद खान यांच्या अभिजात ‘स्वरसौंदर्या’चे घडलेले सुखद दर्शन... त्यांच्या आविष्कारांना ओठातून उमटलेली ‘वाह’ची दाद... अशा प्रफुल्लित वातावरणात रसिकांची दिवाळी पहाट सप्तसुरांमध्ये रंगली. गायन आणि वादनाच्या अद्वितीय अशा ‘सुरेल’ सादरीकरणांनी रसिकांचा पाडवा ‘गोड’ झाला.
निमित्त होते, युवराज ढमाले कॉर्पोरेशन आणि क्रिस्टा यांच्या सहयोगाने आयोजित लोकमत ‘स्वरचैतन्य’ दिवाळी पहाट कार्यक्रमाचे. महालक्ष्मी लॉन्स येथे पहाटे ५.३० वाजता या स्वरमयी आविष्काराला रसिकांच्या अभूतपूर्व प्रतिसादात प्रारंभ झाला. प्रसिद्ध युवागायक राहुल देशपांडे यांच्या गानमैफलीने स्वरचैतन्याची नांदी झाली. त्यांच्या स्वरांनी आसमंतात मांगल्याचे रंग भरले. रामकली रागापासून प्रारंभ करीत ‘जाओ जाओ जगह जगह, लंगरवा पिअरवा सोने ना दे’ ही बंदिश त्यांनी खुलवली. निखिल फाटक यांच्या तबला साथीने त्यांच्या मैफलीला चारचाँद लावले. सजन आयो रे या बंदिशीबरोबर ‘अलबेला सजन आयो रे’ आणि निर्गुण भजन सादर करून त्यांनी मैफलीची सांगता केली. हार्मोनिमवर राहुल गोळे आणि तानपुºयावर ॠषीकेश पाटील व नारायण खिलारे यांनी तानपुºयावर साथसंगत केली. कार्यक्रमाचे बहारदार निवेदन आनंद देशमुख यांनी केले.
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सतारवादक नीलाद्रीकुमार यांचे स्वरमंचावर आगमन होताच टाळ्यांचे सूर निनादले. सतारीच्या तारा हळुवारपणे छेडत त्यांनी मैफलीचा ताबा घेतला. बसंत बुखारी रागातील आलाप, जोड, झाला सादर करून त्यांनी रसिकांच्या हृदयाचा ठाव घेतला. सतारीसारख्या मंजूळ तंतुवाद्याचे एका वेगळ्याच स्टाईलमध्ये सादरीकरण करून पाश्चात्य ‘गिटारी’चा अनोखा फिल त्यांनी रसिकांना दिला. सतारीवर त्यांची बोटे इतकी लीलया
फिरत होती, की त्यांच्या वादनाने सर्व जण देहभानच हरपून गेले. ओठातून केवळ ‘वाह,’ ‘सुंदर,’ ‘अप्रतिम’ अशा विशेषणांचीच दाद मिळत होती. त्यांच्या अद्वितीय आविष्काराने रसिकांची पहाट संस्मरणीय झाली.
ज्यांच्या स्वरांनी आनंदाचा कळसाध्याय गाठल्याची अनुभूती येते अशा रामपूर-सहास्वन घराण्याचे प्रसिद्ध गायक उस्ताद राशीद खान यांच्या स्वरमैफलीने कार्यक्रमाचा उत्तरार्ध अधिकच रंगला. स्वरांवरील जबरदस्त हुकूमत आणि अभ्यासपूर्ण गायकीतून त्यांनी ‘मियाँ की तोडी’ राग आळविला. सत्यजित तळवलकर यांच्या उत्तम तबला सादरीकरणाने मैफलीची पकड घेतली. राशीद खान यांनीही त्यांना दाद देत आपल्या मोठेपणाची प्रचिती दिली. भैरवीने त्यांनी मैफलीची समाप्ती केली. त्यांना सारंगीवर मुराद अली आणि तानपुºयावर निखिल जोशी आणि नागेश आडगावकर यांनी साथसंगत केली. लोकमतचे वरिष्ठ व्यवस्थापक निनाद देसाई, महाव्यवस्थापक मिलन दर्डा आणि उपमहाव्यवस्थापक आलोक श्रीवास्तव यांनी स्वागत केले.
महालक्ष्मी लॉन्सचा परिसर पहाटे पाच वाजल्यापासूनच गजबजून गेला होता. पारंपरिक वेशात दिवाळीच्या उत्साहात रसिक येत होते. गायन आणि वादनाच्या या मैफलीत सहभागी होण्यासाठी अनेक जण कुटुंबासह आले होते.
या कार्यक्रमाचे प्रस्तुतकर्ते युवराज ढमाले कॉर्प, सहयोगी प्रायोजक क्रिस्टा एलिव्हेटर्स, सहप्रायोजक काका हलवाई स्वीट सेंटर, पीएनजी १८३२, ट्रॅव्हल पार्टनर मँगो हॉलिडेज, सहप्रायोजक पॅन्टालून्स, रोझरी ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट, लक्ष्मीनारायण चिवडा, कावरे आईस्क्रिम, चार्वी साडी, बँकिंग पार्टनर सेंट्रल बँक आॅफ इंडिया, साई मोटार ड्रायव्हिंग स्कूल, वेस्टर्न मॉल, हॉस्पिटॅलिटी पार्टनर, जे. डब्ल्यू. मॅरिएट, आऊटडोअर पार्टनर धीरेंद्र आऊटडोअर, टी पार्टनर विक्रम टी मीडिया सोल्यूशन होते.
>रसिकांनी अनुभवला अत्तराचा सुगंध
लोकमतने स्वरचैतन्याचा आस्वाद घेण्यासाठी आलेल्या रसिकांचे स्वागत हाताला अत्तर लावून केले. या सुगंधाच्या सुवासाचा दरवळ संपूर्ण आसमंतात पसरला होता. मन मोहून टाकणाºया या गंधाच्या धुंदीत स्वरांची जादू रसिकांनी अनुभवली.
दिवाळी पहाटला पारंपरिकतेचा टच
महालक्ष्मी लॉन्स येथे आगमन होताच आकर्षक पद्धतीने सजावट केलेली बैलगाडी सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती. शहरी भागात बैलगाडी अनुभवणे तशी दुर्मिळच गोष्ट आहे. त्यामुळे रसिकांना बैलगाडीजवळ सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही. सुरुवातीपासून शेवटपर्यंत सेल्फीसाठी कॅमेरे क्लिक होत होते.
तरुणाईचे प्रमाण लक्षणीय
रॉक बँडच्या जमान्यातही तरुणाई शास्त्रीय संगीताच्या मैफलींना गर्दी करू लागली आहे. याचा प्रत्यय लोकमतच्या स्वरचैतन्य दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात अनुभवास मिळाला. नटून थटून अत्यंत पारंपरिक पेहरावात तरुण पिढीने दिवाळी पहाटला हजेरी लावली.
>‘लोकमतने उपक्रम कायम सुरू ठेवावा’
लोकमतने ‘दिवाळी पहाट’चा उपक्रम सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे तो पुढे कायम सुरू राहावा. कारण अशा कार्यक्रमांमुळे युवा कलाकारांना व्यासपीठ मिळते. ‘पूना में एक बार कलाकार को हरी झंडी दिखती है तो आगे जाकर लाल झंडी दिखती नहीं है.’
- नीलाद्रीकुमार, आंतराराष्ट्रीय ख्यातीचे सतारवादक