‘स्वच्छ’ला ११० नगरसेवक आणि ६ लाख ६२ हजार कुटुंबांचा पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:11 AM2021-02-24T04:11:34+5:302021-02-24T04:11:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : स्थायी समितीकडून खासगी ठेकेदारांसाठी पायघड्या घालत स्वच्छ सेवा सहकारी संस्थेचे काम काढून घेण्याच्या हालचाली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : स्थायी समितीकडून खासगी ठेकेदारांसाठी पायघड्या घालत स्वच्छ सेवा सहकारी संस्थेचे काम काढून घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. एकीकडे पदाधिकारी निविदा काढण्याचा अट्टहास करीत असतानाच शहरातील ११० सर्वपक्षीय नगरसेवकांनी ‘स्वच्छ’च्या कामाला लेखी पाठिंबा दिला आहे. याशिवाय तब्बल ६ लाख ६२ हजार ९७८ कुटुंबांनीही ‘स्वच्छ’च्या कामाबद्दल समाधानी असल्याचे मत नोंदवले आहे.
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी (दि. २३) महापौर मुरलीधर मोहोळ यांची भेट घेऊन त्यांना याची माहिती दिली. ‘स्वच्छ’कडून काम न काढण्याची विनंती त्यांना केली. शहरातील साडेतीन हजार कचरावेचकांनी नागरिकांकडून घेतलेल्या स्वाक्षऱ्यांचा २५ हजार पानी अहवाल या वेळी महापौरांना देण्यात आला. स्थायी समितीने जानेवारी महिन्यात स्वच्छ सेवा संस्थेच्या कामाला एक महिन्याची मुदतवाढ दिली. फेब्रुवारीत पुन्हा एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली. पालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आहे. स्थायी समितीवर भाजपाचेच वर्चस्व आहे. ‘स्वच्छ’च्या कर्मचाऱ्यांना पाठिंबा दिलेल्या नगरसेवकांमध्ये सर्वाधिक नगरसेवक भाजपाचेच आहेत.
चौकट
साडेतीन हजारांच्या पोटाचा प्रश्न
महानगरपालिका आणि कागद काच पत्र कष्टकरी पंचायतीद्वारे ‘स्वच्छ’ची स्थापना झाली. गेल्या वीस वर्षांपासून या संस्थेचे काम सुरू आहे. पालिकेसोबतचा करार संपल्याने तो वाढविण्याबाबत ‘स्वच्छ’ने प्रस्ताव दिला आहे. परंतु, स्थायी समितीच्या इशाऱ्यावर प्रशासनाने निविदा राबविण्याचा घाट घातला आहे. यामुळे शहरातील साडेतीन हजार कचरावेचकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे.
चौकट
“कचरावेचकांची प्रत्यक्ष भेट घेऊन ११० नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागात ‘स्वच्छ’चेच काम पुढेही सुरु राहावे, खाजगी कंत्राटदार नको असे पत्र दिले आहे. नागरिकांचाही वाढता पाठिंबा आहे. खाजगी कंत्राटदारीमधून कामगारांना त्रास आणि अन्यायायाशिवाय काहीही मिळणार नाही.”
- सुमन मोरे, अध्यक्ष, स्वच्छ सेवा सहकारी संस्था
चौकट
“आमच्या सोसायटीत ‘स्वच्छ’कडूनच कचरा गोळा करण्याचे काम होते. सोसायटीतील रहिवासी कचरावेचकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना सहकार्य करतात. ‘स्वच्छ’च्या कामावर विश्वास असल्याने भविष्यात त्यांचीच सेवा मिळावी असा आमचा आग्रह असेल.”
- संजय भिडे, कोथरूड