‘सवाई’मध्ये स्वराविष्काराचा साज
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 01:01 AM2018-12-17T01:01:45+5:302018-12-17T01:02:02+5:30
विवेक सोनार यांचे बासरीचे मधुर स्वर : सावनी शेंडे-साठ्ये, दत्तात्रय वेलणकर यांच्या सुमधुर गायकीने रसिक झाले मंत्रमुग्ध
पुणे : विवेक सोनार यांच्या सुरेल वादनातून हवेत मिसळलेले बासरीचे मधुर स्वर... सावनी शेंडे-साठ्ये, दत्तात्रय वेलणकर यांची सुमधुर गायकी अशा वातावरणात सूर-तालाचा अनोखा स्वराविष्कार शनिवारी रसिकांसमोर पेश झाला. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या चौथ्या दिवशी रसिकांवर सूरांची बरसात झाली.
चौथ्या दिवसाची सुरुवात ग्वाल्हेर-किराणा घराण्याचे दत्तात्रय वेलणकर यांच्या सुमधुर गायनाने झाली. त्यांनी मुलतानी राग सादर करीत गायनाचा श्रीगणेशा केला. पटदीप रागामधील ‘नैया पार करो’ ही रचनाही सादर केली. ‘संतभार पंढरीत’ या अभंगाने वातावरण भक्तिमय झाले. वेलणकर यांना प्रशांत पांडव (तबला), अविनाश दिघे (हार्मोनियम), सोमजीत लाल व शरत देसाई (तानपुरा) यांनी साथसंगत केली.
सावनी शेंडे-साठ्ये यांनी आपल्या आश्वासक गायकीतून अभिजात शास्त्रीय संगीताचे सौंदर्य खुलवले. सुरुवातीला त्यांनी मधुवंती रागाचा विस्तार करीत गायनातील बैठकीचे दर्शन घडविले. ‘जागे मोरे भाग’, ‘री नंदलाल घर मोरे आएं’ या रचना सादर केल्या. ‘श्री अंबिका जगदंब भवानी’ अशा सुश्राव्य रचनेतून रसिकांना खिळवून ठेवले. त्यांनी सादर केलेली पं. भोलानाथ भट यांची रागमाला; तसेच शोभा गुर्टू यांचा ‘सैया रूठ गएं मैं मनाती रही’ या दादराने मैफलीचा कळसाध्याय गाठला. रसिकांनी त्यांच्या गायनाला टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यांना केदार पंडित (तबला), राहुल गोळे (हार्मोनियम), प्रीती पंढरपूरकर व अक्षता गोखले (तानपुरा) यांनी साथसंगत केली.
विवेक सोनार यांच्या बासरीचे मधुर स्वर, त्याच्या साथीला पं. रामदास पळसुले यांचे अंगावर शहारे आणणारे तबल्याचे बोल आणि पं. भवानीशंकर यांचा अंतर्मुख करणारा पखवाज असा त्रिवेणी संगम कानसेनांनी अनुभवला. पं. हरिप्रसाद चौरसिया यांचे शिष्य असलेले
विवेक सोनार यांनी बासरी वादनातून राग ‘वाचस्पती’ रसिकांसमोर उलगडला.
त्यांनी आलाप, जोड; तसेच मत्त ताल व तीन तालांतील सुरेल रचना सादर केल्या. त्यांना पं. रामदास पळसुले (तबला), पं. भवानी शंकर (पखावज) आणि विनय चित्राव (तानपुरा) यांनी साथसंगत केली.
घरंदाज गायकी... अभिजात स्वरांची मैफल
दमदार आविष्कार : पं. गोकुलोत्सव महाराज, देवकी पंडित यांचे गायन
पुणे : पं. गोकुलोत्सव महाराज यांची घरंदाज गायकी... देवकी पंडित यांच्या अभिजात स्वरांची सहजसुंदर मैफल... अन् उस्ताद शाहीद परवेज यांच्या सतारवरील सूरांची जादूई मोहिनी... अशा ज्येष्ठ कलाकारांच्या दमदार आविष्कारांनी सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा उत्तरार्ध रंगतदार ठरला.
महोत्सवाच्या दुसऱ्या सत्रात पं. भीमसेन जोशी यांचे पुत्र व शिष्य श्रीनिवास जोशी यांचे गायन झाले. त्यांनी राग ‘बिहाग’ सादर केला. ‘कान्होबा तुझी घोंगडी चांगली’ या त्यांनी गायलेल्या अभंगालाही श्रोत्यांची दाद मिळाली. त्यांना पांडुरंग पवार (तबला), राहुल गोळे (हार्मोनियम), मुकुंद बादरायणी आणि नामदेव शिंदे (तानपुरा), माऊली टाकळकर (टाळ) यांनी साथसंगत केली.
पं. गोकुलोत्सव महाराज यांनी बहारदार सादरीकरणातून घरंदाज गायकीचा प्रत्यय दिला. राग ‘हंसध्वनी’ मधील रचना; तसेच राग ‘जनसंमोहिनी’मधील एक स्वरचित बंदिश त्यांनी प्रस्तुत केली. त्यांनी सादर केलेल्या स्वरचित
रागमालेलाही श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्यांना सदानंद नायमपल्ली (तबला), अविनाश दिघे (हार्मोनियम), नामदेव शिंदे व अक्षय गरवारे (तानपुरा) यांनी साथसंगत केली.
मला पुण्यात गायला नेहमीच आवडते, अशी भावना व्यक्त करून झिंझोटी रागात द्रुत तालातील पारंपरिक बंदिश त्यांनी सादर केली
देवकी पंडित यांनी राग ‘झिंजोटी’ने आपल्या गायनाला सुरुवात केली. संगीतातील अवघड जागाही आलापीद्वारे सहज व लीलया सादर करण्याच्या त्यांच्या शैलीस रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. कीतक दिन हरि सुमिरन दिन होए हे भजन सादर करून त्यांनी मैफलीची सांगता केली. त्यांना रोहित मुजुमदार (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनियम) आणि सुस्मिरता डवाळकर (तानपुरा) यांनी साथसंगत केली.
४ज्येष्ठ सतारवादक उस्ताद शाहीद परवेज यांच्या सतारीवरच्या मंजूळ सुरांनी नीरव शांततेची अनुभूती दिली. तंतूवाद्यावर लीलया फिरणाºया जादूई बोटांमधून वादनातील नजाकता रसिकांनी अनुभवली. त्यांच्या अप्रतिम अशा सादरीकरणाने महोत्सवाच्या उत्तरार्धाची सांगता झाली.