चाकण शहरासह ग्रामीण भागात वाढला स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 12:44 AM2018-09-15T00:44:25+5:302018-09-15T00:44:51+5:30
काळजी घेण्याचे आवाहन; एकाच महिन्यात तीन बळी गेल्याने वाढली चिंता, प्रशासन ढिम्म
आंबेठाण : चाकणसह ग्रामीण भागात पुन्हा एकदा स्वाइन फ्लूने चांगलेच डोके वर काढले असून, आतापर्यंत दोन महिलांसह एका तरुणाचा या गंभीर आजाराने बळी गेला आहे. या तिन्ही रुग्णांचा स्वाइन फ्लूने उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, आरोग्य विभागाने हे बळी जाऊन कुठल्याही प्रकारची उपाययोजना केल्या नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
भरत शिवळे (वय ३४, रा. म्हाळुंगे) या तरुणासह अनिता सिंग (वय ३०, रा. मेदनकरवाडी), शर्मिला कड (वय ३५, रा. कडाचीवाडी) असे मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत. हे तिन्ही बळी एक महिन्यात स्वाईन फ्लूने गेले आहेत. या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यापासून त्यांना कृत्रिम श्वासोच्छ्वासावर (व्हेंटिलेटर) ठेवण्यात आले होते. वैद्यकीय अहवालामध्ये संबंधितांना स्वाईन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याकरिता जनजागृती करण्याची गरज आहे. हा आजार आटोक्यात आणण्यासाठी चाकण ग्रामीण रुग्णालयात स्वाईन फ्लूप्रतिबंधक लसीचा साठा तत्काळ मोफत उपलब्ध करून देण्याची गरज आहे. या आजाराबाबत स्थानिक प्रशासन, आरोग्य विभाग आणि ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर यांनी दक्षता व जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र, खेड तालुक्यातील वैद्यकीय विभाग सर्व काही आलबेल असल्याच्या अविर्भावात आहेत.
वैद्यकीय अधीक्षक म्हणतात...
वैद्यकीय अधीक्षक डॉ. माधव कणकवले यांनी सांगितले, की सर्दी, खोकला, ताप असेल तर शक्यतो कामावर जाऊ नये, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, खोकताना, शिकताना तोंडाला रुमाल लावावा, धूम्रपानाच्या सवयीमुळे श्वसनशक्ती कमी होते. त्या विषाणूचे प्रवेशद्वार श्वासनलिका आहे, नाकाच्या आणि घशातील स्रावातील थेंबामुळे हा आजार पसरतो. खोकताना, शिकताना हे थेंब इकडेतिकडे पडतात. हात सातत्याने साबण व पाण्याने धुवावेत. पौष्टिक आहार घ्यावा, हिरव्या पालेभाज्या खाव्यात.
तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. स्वाइन फ्लूचा रुग्ण आढळल्यास त्वरित औषधोपचार सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातील सर्व आरोग्य केंद्रात स्वाईन फ्लूची औषधे उपलब्ध करून दिली आहेत. - साहिल गोरे, तालुका वैद्यकीय अधिकारी.