Vidhan Sabha 2019: युतीत पुणे आणि मुंबईच्या जागांमध्ये अदलाबदली ?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 05:28 PM2019-09-20T17:28:13+5:302019-09-20T17:44:21+5:30
पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांवर सध्या भाजपचे आमदार आहेत. अशा परिस्थितीत युतीच्या वाटाघाटीत पुण्यातली जागा शिवसेनेला लढवण्याची संधी दिल्यास त्याबदल्यात भाजपला शिवसेनेची मुंबईतील विद्यमान जागा मिळावी.
पुणे :पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांवर सध्या भाजपचे आमदार आहेत. अशा परिस्थितीत युतीच्या वाटाघाटीत पुण्यातली जागा शिवसेनेला लढवण्याची संधी दिल्यास त्याबदल्यात भाजपला शिवसेनेची मुंबईतील विद्यमान जागा मिळावी असे मत खासदार गिरीश बापट यांनी पुण्यात केले.
पुण्यात एका कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी पुण्यात शिवसेनेला देण्यात येणाऱ्या जागांवर मत व्यक्त केले. पुण्यात आठही मतदारसंघ भाजपकडे असल्यामुळे सेनेचे कार्यकर्ते चिंतेत आहेत. युतीच्या वाटाघाटीत शहरातील एकही जागा सेनेला मिळाली नाही तर त्यांना अजून पाच वर्ष वाट बघावी लागणार आहे. त्यामुळे अनेकांनी नेतृत्वाकडे चार नाही पण निदान तीन जागा तरी मिळाव्यात अशी मागणी केली आहे. शहरात भाजप-सेनेचे फार सख्य आणि थेट भांडणही नाही. महापालिका निवडणुकीतही दोन्ही पक्ष विरोधात लढले होते. तिथेही सत्ता स्थापनेनंतर भाजपने सेनेला सामावून घेतले नाही. दुसरीकडे भाजपच्या शहराध्यक्ष माधुरी मिसाळ यांनी आठही जागा लढण्याची तयारी असल्याचे सांगितले आहे. अशा स्थितीत सेनेला शहरात संघटनेला आलेली मरगळ झटकण्यासाठी काही जागा तरी लढवणे गरजेचे आहे. त्यामुळे आता युतीच्या वाटाघाटीत पुण्याच्या निर्णयाकडे इच्छुकांचे लक्ष लागून आहे.
अशा परिस्थितीत ज्येष्ठ नेते आणि खासदार म्ह्णून बापट यांच्या मताकडे दुर्लक्ष करता येणार नाही. याविषयी ते म्हणाले की, जागा वाटपाच्या सूत्रात ही चर्चा होईल तेव्हा विद्यमान जागा शक्यतो त्याच पक्षाला दिली जाते. त्यामुळे सेनेने एखादी विद्यमान जागा मागितल्यास त्यांची मुंबईची एखादी विद्यमान जागा मागितली जाईल. याबाबत अंतिम निर्णय प्रदेशाध्यक्ष आणि युतीचे घेतील असेही त्यांनी स्पष्ट केले.