प्रभागातील मतदारांची अदलाबदली

By Admin | Published: January 13, 2017 03:51 AM2017-01-13T03:51:10+5:302017-01-13T03:51:10+5:30

आगामी महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी ४१ प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी पालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध

Swap voters | प्रभागातील मतदारांची अदलाबदली

प्रभागातील मतदारांची अदलाबदली

googlenewsNext

पुणे : आगामी महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी ४१ प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी पालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. त्यामध्ये अनेक प्रभागांमधील मतदारांच्या अदलाबदली झाल्या असून, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. या मतदार यादीतील नावांबाबत काही हरकती, दुरुस्ती असल्यास त्या १७ जानेवारीपर्यंत निवडणूक कार्यालयांमध्ये दाखल करता येणार आहेत. या प्रारूप मतदार यादीवर मोठ्या प्रमाणात हरकती दाखल होण्याची शक्यता आहे. या हरकतींची सुनावणी घेऊन २१ जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादींमध्ये बऱ्याच ठिकाणी गोंधळ झाल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत. स्वारगेट येथील नाईक बी- बियाणे केंद्र, सेवा मित्र मंडळचा भाग हा प्रभाग क्रमांक १५मध्ये येत असताना तो प्रभाग १८मध्ये दाखविण्यात आला. त्याचबरोबर सोन्या मारूती परिसरातील काही भाग प्रभाग १७ मध्ये येत असताना प्रभाग १८मध्ये समाविष्ट करण्यात आल्याची तक्रार ऋषी बालगुडे यांनी केली आहे.
येरवड्याच्या व्हाइट हाऊस सोसायटीचा परिसर तसेच रामवाडीचा काही भाग प्रभाग ५ मध्ये येत नसतानाही तो जोडण्यात आल्याची तक्रार आशिष माने यांनी केली आहे. प्रभागनिहाय याद्या करताना प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेतली गेली नसल्याचे या तक्रारींवरून स्पष्ट होत आहे. सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये तसेच सावरकर भवन येथील मुख्य निवडणूक कार्यालयामध्ये मतदार यादींबाबतच्या हरकती स्वीकारल्या जाणार आहेत.
प्रभागांची रचना करताना भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून हस्तक्षेप करण्यात आल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात कण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर प्रभागनिहाय मतदारांच्या याद्या तयार करतानाही त्यामध्ये गोंधळ झाल्याचा आरोप मनसेचे शहराध्यक्ष हेमंत संभूस यांनी केला आहे. अनेक सोसायट्यांमधील मतदारांची नावे वेगळ्याच प्रभागात दिसत असल्याची तक्रार त्यांनी निवडणूक विभागाकडे केली आहे. (प्रतिनिधी)

विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार यादीच्या आधारे प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या यापुर्वीच प्रकाशित करण्यात आल्या होत्या. १ जानेवारी २०१७ पर्यंत वयाची अठरा वर्षे पूर्ण होत असलेल्या तरुण-तरुणींच्या तसेच नवमतदारांची नावांची पुरवणी यादींसह पुन्हा पारूप मतदार यादी गुरूवारी प्रसिध्द करण्यात आली आहे. अंतिम प्रभागनिहाय मतदार यादी २१ जानेवारी प्रसिध्द होईल. त्यानंतर या प्रभगांमधील मतदार केंद्र निहाय ८ फेब्रुवारी रोजी प्रसिध्द केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दुरुस्त्यांसाठी खूपच कमी वेळ
पारूप मतदार यादीतील नावांच्या अदलाबदलीबाबत हरकती नोंदविण्यासाठी केवळ ५ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. इच्छुक उमेदवारांना सर्व मतदार याद्यांची छाननी करून त्यातील दुरुस्त्यांसाठी हरकती घेण्यास खूपच कमी वेळ उपलब्ध आहे. पालिकेची निवडणूक फेब्रुवारी महिन्यात होत आहे. नियमानुसार १ फेब्रुवारी २०१७ पर्यंत वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या मतदारांची नावे निवडणुकीच्या मतदार यादीत समाविष्ट करणे बंधनकारक होते. त्यामुळे या प्रक्रियेसाठी खूपच कमी वेळ उपलब्ध करून देता आला असे निवडणूक विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
काही राजकीय नेत्यांनी प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर लगेच आपल्या भागातील मतदारांची अदलाबदल केल्याची चर्चा सुरू केली आहे. काही प्रभागात तर दोन ते तीन हजार मतदारांचे स्थलांतर झाले आहे.


तटस्थ प्रक्रिया राबविण्यावर भर
प्रभागरचनेबरोबर प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्येही हस्तक्षेप झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
यापार्श्वभुमीवर महापालिका निवडणुकीची प्रक्रिया संपूर्णपणे तटस्थपध्दतीने राबविण्यात येणार असल्याचे पालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी स्पष्ट केले आहे.
शहरात कुठेही आचारसंहितेचा भंग झाल्याचे आढळून आल्यास संबंधितांविरूध्द फौजदारी गुन्हे दाखल केले जातील असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Swap voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.