'एखाद्या मंत्र्याच्या मुलानं आत्महत्या करावी, मग त्यांना समजेल'; स्वप्नील लोणकरच्या आईचा आक्रोश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2021 03:50 PM2021-07-04T15:50:41+5:302021-07-04T15:55:01+5:30
स्वप्नील लोणकर एमपीएससीच्या २०१९च्या पूर्व व मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाला होता. मात्र, त्याची मुलाखत दीड वर्षांपासून झाली नव्हती. स्वप्नीलविषयी बोलताना त्याच्या आईला अश्रू अनावर झाले.
मुंबई/ पुणे: MPSC हे मायाजाल आहे असं म्हणत एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या एका तरुणानं पुण्यात आत्महत्या केली आहे. पुण्यातील फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या स्वप्नील लोणकर असं या २४ वर्षाच्या तरुणाचं नावं आहे. आत्महत्या करण्यापूर्वी स्वप्नीलने लिहिलेल्या सुसाईड नोटमधे आर्थिक परिस्थितीला कंटाळून आणि एमपीएससीची परीक्षा प्रक्रिया रखडल्याने आत्महत्या करत असल्याच म्हटलं आहे. एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरही २ वर्षे मुलाखत झालीच नाही आणि स्वप्निल हळूहळू नैराश्यात गेला. या काळात घरची परिस्थिती आणि परीक्षेनंतर नोकरी लागेल या आशेवर घेतलेलं कर्ज यासारख्या कारणांमुळेही स्वप्निलवरील तणाव वाढत गेल्याने त्यांने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.
स्वप्नीलच्या आई-वडिलांनी आपल्या पोटच्या गोळ्याला गमावलं. स्वप्नीलचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांनी अनेक कष्ट सोसले होते. स्वप्नील त्यांच्या आई-वडिलांच्या कष्ट्वाचे चिज करत होता. तो एमपीएससीच्या २०१९च्या पूर्व व मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाला होता. मात्र, त्याची मुलाखत दीड वर्षांपासून झाली नव्हती. स्वप्नीलविषयी बोलताना त्याच्या आईला अश्रू अनावर झाले.
आज एखाद्या मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या केली असती तर मंत्र्याला जाग आली असती का नाही? तसंच दुसऱ्यांच्या आई-वडिलांचाही विचार करा. त्यांच्यावर काय परिस्थिती ओढावली असेल. स्वप्नील हुशार होता, त्यामुळे आम्ही त्याला शिकवलं. तो परीक्षा पासही झाला. पण, मुलाखत होत नसल्याने तो आत्महत्येस प्रवृत्त झाला. माझा तळतळाट आहे की एखाद्या मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या करावी. त्याशिवाय सरकारला कळणार नाही की मुलगा जाण्याचं दु:ख काय असतं, असं म्हणत स्वप्नीलच्या आईनं राग व्यक्त केला.
दरम्यान, २ वर्षे झाली आहेत उत्तीर्ण होऊन आणि २४ वय संपत आलंय. घरची एकंदरीत परिस्थिती, परीक्षा निघणार या आशेवर घेतलेलं कर्ज, खासगी नोकरी करून कधी ही न फिटू शकणारा कर्जाचा डोंगर, घरच्यांच्या आणि इतर सर्वांच्या वाढत्या अपेक्षा आणि माझी मी प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी कमी पडतोय ही भावना! करोना नसता, सर्व परीक्षा सुरळीत झाल्या असत्या तर आज आयुष्य खूप वेगळं आणि चांगल असतं. हवं ते, ठरवलं ते प्रत्येक साध्य झालं असतं. मी घाबरलो, खचलो असं मुळीच नाहीये, फक्त मी कमी पडलो. माझ्याकडे वेळ नव्हता, असं स्वप्निल पत्रात म्हटलं आहे.
नकारात्मकतेची ही वादळं कित्येक दिवस ही मनात होती. पण काही तरी चांगल होईल, या आशेवर तग धरला होता. पण आता इथून पुढे आयुष्य सुरू राहू शकेल, असं काहीच उरलं नाहीये. यांस कोणतीही व्यक्ती कारणीभूत नसून हा माझा सर्वस्वी निर्णय आहे. मला माफ करा! मला डोनेशन करून १०० जीव वाचवायचे होते, ७२ राहिले…. जमलं तर हे इतरांपर्यंत पोहोचावा, अनेक जीव वाचतील, असंही स्वप्निल आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.