लाल मातीवरच स्वप्नीलने घेतला अखेरचा श्वास; हृदयविकाराचा झटक्याने पैलवानाचा दुर्दैवी अंत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 08:43 PM2023-03-08T20:43:58+5:302023-03-08T20:52:07+5:30
स्वप्निलच्या आकस्मित मृत्यूमुळे कुस्ती खेळाच्या विश्वात शोककळा...
पुणे : पैलवानाला व्यायाम करत असताना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याची घटना पुणे शहर परिसरात घडली. या पैलवानाला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तोपर्यंत फार उशिर झाला होता. स्वप्नील पाडाळे असे 31 वर्षीय मयत पैलवानाचे नाव आहे. रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी स्वप्नीलला मृत घोषित केले. पुण्यातील मारुंजी येथील कुस्तीच्या तालमीत आज सकाळी साडे सातच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. स्वप्नीलच्या आकस्मित मृत्यूमुळे कुस्ती खेळाच्या विश्वात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्नील हा नेहमीप्रमाणे सरावासाठी मारुंजी या ठिकाणी असलेल्या कुस्तीच्या तालमीत आला होता. कुस्तीसाठी सराव करताना पैलवानांना सपाट्या मारायच्या असल्यामुळे स्वप्नीलदेखील व्यायाम करत होता. व्यायाम करताना अचानक स्वप्नीलला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि अचानक व्यायाम करताना खाली पडला. अचानक खाली पडल्याचे पाहताच तालमीतील इतर जणांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.
स्वप्नीलने मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलनातून कुस्तीचे प्रशिक्षण घेतले असून तो सध्या अनेक ठिकाणी मुलांना कुस्ती शिकवायचा. स्वप्निलच्या आकस्मित मृत्यूमुळे कुस्ती खेळाच्या विश्वात शोककळा पसरली आहे.