VIDEO: त्याला मुलीला देशसेवेसाठी पुढे आणायचे होते पण एका उडीमुळे स्वप्निलचे स्वप्न वाहून गेले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 12:12 PM2024-07-03T12:12:24+5:302024-07-03T12:15:03+5:30

ताम्हिणी घाटात वर्षाविहारासाठी गेलेले देवकुंड धबधब्यात भोसरीतील स्वप्निल धावडे यांनी उडी मारली....

Swapnil's dream was swept away by a leap; The girl was to be brought forward for national service | VIDEO: त्याला मुलीला देशसेवेसाठी पुढे आणायचे होते पण एका उडीमुळे स्वप्निलचे स्वप्न वाहून गेले

VIDEO: त्याला मुलीला देशसेवेसाठी पुढे आणायचे होते पण एका उडीमुळे स्वप्निलचे स्वप्न वाहून गेले

भोसरी (पुणे) : अकाली वडिलांचे छत्र हरवले. आईने सांभाळ केला. चांगले शिक्षण दिले. मुलानेही आईच्या कष्टाचे चीज करत देशसेवेत स्वतःला झोकून दिले. सैन्य दलात चांगली नोकरी मिळाली. पोलिस दलात काम करणारी पत्नी आयुष्याच्या जोडीदाराच्या रूपात मिळाली. आता मुलीलाही देशसेवेसाठी तयार करायचे या हेतूने मार्गक्रमण करत असतानाच काळाने घाला घातला. ताम्हिणी घाटात वर्षाविहारासाठी गेलेले देवकुंड धबधब्यात भोसरीतील स्वप्निल धावडे यांनी उडी मारली.

पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते वाहून गेले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. मात्र, यामुळे स्वप्निलची अनेक स्वप्नं मात्र तशीच राहिली. मुळशी तालुक्यातील ताम्हिणी घाट परिसरातील प्लस व्हॅलीतील देवकुंड धबधब्याच्या परिसरात भोसरीतील स्वप्निल धावडे वाहून गेले. यात त्यांचा मृत्यू झाला. धावडे यांचा मृतदेह तिसऱ्या दिवशी आढळून आला. धावडे हे सैन्य दलातून वर्षभरापूर्वी निवृत्ती झाले होते. ते बॉक्सिंगचे राष्ट्रीय खेळाडू होते. या बॉक्सिंगपटूच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे भोसरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. स्वप्निल हे पिंपरी चिंचवड शहर पोलिस दलातील नेमबाज रश्मी धावडे यांचे पती होत. स्वप्निल यांचा मृतदेह माणगाव येथून भोसरी येथे आणण्यात आला. भोसरी तळ्याकाठी सोमवारी रात्री साडेअकरा वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दुसरी उडी होत्याचे नव्हते करून गेली..

स्वप्निल धावडे हे भारतीय सैन्य दलात कार्यरत होते. अठरा वर्षे सेवा बजावल्यानंतर वर्षभरापूर्वी ते सेवानिवृत्त झाले होते. तसेच ते बॉक्सिंग क्रीडा प्रकारातील राष्ट्रीय खेळाडू होते. सेवानिवृत्तीनंतर ते एका जिममध्ये ट्रेनर म्हणून काम करत होते. जिममधील ३२ जणांच्या ग्रुपसोबत स्वप्निल हे रविवारी ताम्हिणी घाटात फिरायला गेले होते. त्यावेळी त्यांची इयत्ता सहावीत शिकणारी मुलगी सोबत होती. तिथे प्लस व्हॅली येथे धबधब्याच्या कुंडात स्वप्निल यांनी उडी मारली. दरम्यान, त्यांचा एक सहकारी याचा व्हिडीओ बनवत होता. स्वप्निल यांनी धबधब्याच्या कुंडात उडी मारल्यानंतर त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. ते बाजूला येण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, पाण्याच्या प्रवाहात ते वाहून गेले. वाहून जाताना जो व्हिडीओ चित्रित झाला, त्यापूर्वी स्वप्निल यांनी पहिली उडी मारली होती. जेव्हा ते वाहून गेले, त्यावेळी ती दुसरी उडी होती. ही उडी मारली नसती तर कदाचित स्वप्निल आज आपल्यामध्ये असते, अशा भावना त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

स्वप्निल धावडे यांचे वडील संपत धावडे भोसरी पंचक्रोशीतले नामांकित कुस्तीपटू होते. त्यांचे अकाली निधन झाले. त्यांच्या निधनानंतर स्वप्निल यांच्या आईने स्वप्निल यांचा सांभाळ केला. वडील कुस्तीपटू असल्याने स्वप्निल यांनाही खेळाची आवड होती. मात्र, त्यांचा कल हा बॉक्सिंगकडे होता. आईनेही या खेळाला अटकाव केला नाही. या खेळाच्या माध्यमातूनच ते पुढे पुढे गेले. नंतर ते सैन्य दलात रुजू झाले. स्वप्निल यांची मुलगी सध्या सहावीमध्ये शिकत आहे. ती दापोडी येथील मिलिटरी ट्रेनिंग स्कूलमध्ये आहे. तिलाही खेळाची प्रचंड आवड आहे. सध्या स्वप्निल यांचा फोकस मुलीवर होता. मुलीलाही खेळातून पुढे आणायचे, देशसेवेसाठी पुढे न्यायचे असा त्यांचा मानस होता, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

Web Title: Swapnil's dream was swept away by a leap; The girl was to be brought forward for national service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.