दगडूशेठ गणपतीला स्वराभिषेक : अंगारकीनिमित्त भाविकांची अलोट गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 08:39 PM2018-04-03T20:39:54+5:302018-04-03T20:39:54+5:30
मंदिराच्या कळसापासून ते गाभा-यापर्यंत विविधरंगी फुलांनी केलेली आकर्षक सजावट आणि विद्युतरोषणाईने पुणेकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
पुणे : गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया...ओम गं गणपतये नम:... अशा गणेशनामाच्या जयघोषाने दगडूशेठ गणपती मंदिराचा परिसर दुमदुमून गेला. अंगारकी चतुर्थी योग असल्याने भाविकांनी दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली. मंदिराच्या कळसापासून ते गाभा-यापर्यंत विविधरंगी फुलांनी केलेली आकर्षक सजावट आणि विद्युतरोषणाईने पुणेकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपती मंदिरामध्ये पहाटे स्वराभिषेकाचे आयोजन करण्यात आले. यावेळी गायिका मुग्धा वैशंपायन हिने गायनसेवा दिली. त्यानंतर गणेशयाग आयोजित करण्यात आला होता. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, महेश सूर्यवंशी, सुनील रासने यांसह विश्वस्त उपस्थित होते.
मंगळवारी पहाटे ३ वाजल्यापासून भाविकांकरीता दर्शनासाठी मंदिर खुले ठेवण्यात आले होते. त्यामुळे भाविकांनी मोठया संख्येने गर्दी केली. अगदी श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर रस्ता, अप्पा बळवंत चौकापर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. मुग्धा वैशंपायन हिने भावगीते आणि भक्तीगीतांच्या माध्यमातून केलेल्या स्वराभिषेकाचे साक्षीदार होण्याची संधी यानिमित्ताने पुणेकरांना मिळाली. मंदिरावर आकर्षक तोरण आणि रांगोळ्यांची सजावट देखील करण्यात आली होती.
------------
वासंतिक उटी, मोगरा महोत्सव बुधवारी
दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे बुधवारी, ४ एप्रिल रोजी मंदिरात वासंतिक उटी, मोगरा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. गणरायाच्या मूर्तीला व मंदिरावर मोग-याच्या लाखो फुलांची ढ़सजावट करण्यात येणार आहे. मोग-याची आरास बुधवारी, सायंकाळी ६ नंतर गणेशभक्तांना पाहण्यासाठी खुली राहणार आहे. मोगरा महोत्सवानंतर रात्री ९ वाजता अखिल भारतीय वारकरी भजनी मंडळाचे उटीचे भजन होणार आहे.