संगीताच्या सुरातून ईश्वरी प्रसाद : निर्मला गोगटे; स्वरानंद प्रतिष्ठानतर्फे कलाकारांचा पुण्यात गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 12:56 PM2018-01-18T12:56:16+5:302018-01-18T13:00:17+5:30
स्वरानंद प्रतिष्ठानच्या वतीने संगीतक्षेत्रातील कलाकारांना ज्येष्ठ गायिका निर्मला गोगटे यांच्या हस्ते विविध पुरस्कार देण्यात आले.
पुणे : पुण्याचा लौकिक सांस्कृतिक राजधानी, रसिक जाणकारांचे शहर आहे. शहरात वर्षभर विविध कलामहोत्सव सुरू असतात. संगीत प्रांत असा आहे, हे महान संगीत जेव्हा आपण ग्रहण करतो तेव्हा आपण खुशीत असतो; परंतु जेव्हा त्याची आपल्याला महानता कळते तेव्हा मन इतके अंतर्मुख होते. या संगीताचा सूर ज्याला गवसला त्याला ईश्वरी प्रसाद मिळाला, अशा शब्दांत ज्येष्ठ गायिका निर्मला गोगटे यांनी भावना व्यक्त केल्या.
स्वरानंद प्रतिष्ठानच्या वतीने संगीतक्षेत्रातील कलाकारांना ज्येष्ठ गायिका निर्मला गोगटे यांच्या हस्ते विविध पुरस्कार देण्यात आले. या प्रसंगी प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त प्रकाश भोंडे, गिरीश जोशी उपस्थित होते. संगीतकार चिनार-महेश यांना केशवराव भोळे पुरस्कार, गायिका सुमेधा देसाई यांना माणिक वर्मा पुरस्कार, प्रियंका बर्वे-कुलकर्णी यांना डॉ. उषा (अत्रे) वाघ पुरस्कार, सतारवादक प्रसाद गोंदकर यांना विजया गदगकर पुरस्कार देऊन गौरविले, कार्यक्रमांमध्ये ध्वनी व्यवस्थेच्या जबाबदारीबद्दल खाडे साऊंडचे प्रदीप व प्रकाश खाडे यांचा विशेष सत्कार केला.
गोगटे म्हणाल्या, ‘‘सांस्कृतिक क्षेत्रातील विविध संस्था एक प्रकारे कलेचीच पूजा बांधत असतात. अशा संस्थांचे कलेतील व कलाकारांच्या आयुष्यातील स्थान खूप मोठे आहे; परंतु संगीत शिकण्यासाठी प्रत्येक क्षण शिष्य बनून राहावे लागते. कलाकारांनी कलेची साधना करताना, काहीही अपेक्षा न ठेवता सातत्याने आपली कला जतन करावी. तर, अंतर्मुख होऊन सातत्याने अलिप्त होऊन आपले गाणे, वादन आपण एकणे खूप महत्त्वाचे आहे.’’
मी गेली १८ वर्षे या रंगामंचाशी निगडित आहे. स्टेजवर वादन करताना आपल्याला नवनवीन शिकायला मिळते. संगीताचे बाळकडू हे मला माझ्या आईकडून मिळाले आहे. तर, माझ्या वादनावर संस्कार माझ्या आई-वडिलांनी केले आहे.
- प्रसाद गोंदकर
कलाकारासाठी पाठीवर कौतुकाची थाप मिळणे फार मोठा गौरव असतो. ही थाप मला या पुरस्काराद्वारे मिळाली आहे.
- प्रियंका बर्वे-कुलकर्णी