शासकीय इतमामात स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
By श्रीकिशन काळे | Published: January 15, 2024 03:12 PM2024-01-15T15:12:10+5:302024-01-15T15:12:31+5:30
प्रत्येकाच्या डोळ्यांमध्ये अश्रू तरळत होते आणि प्रभाताईला मनातून अखेरचा निरोप दिला जात होता
पुणे : किराणा घराण्याच्या ज्येष्ठ शास्त्रीय गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या दर्शनासाठी सोमवारी सकाळी ९ वाजल्यापासून ‘स्वरमयी गुरूकुल’ या ठिकाणी गर्दी झाली होती. प्रत्येकाच्या डोळ्यांमध्ये अश्रू तरळत होते आणि प्रभाताईला मनातून अखेरचा निरोप दिला जात होता. सतत हसमुख आणि प्रसन्न असणारा प्रभाताईंचा चेहरा पाहून प्रत्येकाचे मन भरून येत होते. स्वरमयी गुरूकुलपासून जंगली महाराज रस्त्यावरून वैकुंठभूमी स्मशानभूमीत दुपारी २ वाजण्याच्या सुमारास शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
जंगली महाराज रस्त्याजवळील स्वरमयी गुरूकुल या निवासस्थानी डॉ. प्रभा अत्रे यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत सर्वांना दर्शन घेता यावे म्हणून गुरूकुल सर्वांसाठी खुले होते. त्यानंतर तेथून अंत्ययात्रा वैकुंठभूमी स्मशानभूमीत नेण्यात आली. तेव्हा प्रभाताईंवर प्रेम करणारे शिष्य परिवार, पुणेकर व रसिक उपस्थित होते. जंगली महाराज रस्त्यावरून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली, तेव्हा ठिकठिकाणच्या नागरिकांना त्यांच्या प्रतिमेकडे पाहून हात जोडले. ट्रकवर समोरून आणि मागे अशा दोन अतिशय सुंदर प्रतिमा लावल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरील प्रसन्नता प्रत्येकाला मनाला हेलावून टाकत होती. रस्त्यातील रिक्षावाले देखील हात जोडून नमस्कार करत होते. दुचाकीवरून जाणारे, दुकानात काम करणारे अशा सर्वांनी या अंत्ययात्रेचे दर्शन घेतले. जंगली महाराज रस्त्यावरून टिळक चौकातून (अलका चौक) अंत्ययात्रा दुपारी १ वाजण्याच्या सुमारास वैकुंठभूमीत पोचली. तिथे सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. तसेच जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण पाटील, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल तसेच ज्येष्ठ गायक अजय चक्रवर्ती, पं. अजय पोहनकर, गायक श्रीनिवास जोशी, माजी आमदार उल्हास पवार आदी उपस्थित होते.