ज्येष्ठ सतारवादक उस्ताद उस्मान खान यांना स्वरगंधा सांगीतिक कुटुंब पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:11 AM2021-01-19T04:11:57+5:302021-01-19T04:11:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गानवर्धन संस्थेतर्फे ज्येष्ठ सतारवादक उस्ताद उस्मान खान यांच्यासह त्यांच्या कलाकार कुटुंबीयांना कै. स्वरगंधा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गानवर्धन संस्थेतर्फे ज्येष्ठ सतारवादक उस्ताद उस्मान खान यांच्यासह त्यांच्या कलाकार कुटुंबीयांना कै. स्वरगंधा टिळक स्मृती सांगीतिक कुटुंब पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा विशेष सन्मानही करणार असल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कृ. गो. धर्माधिकारी यांनी कळवली आहे.
शनिवारी (दि. २३) सायंकाळी पाच वाजता, टिळक स्मारक मंदिर सभागृहात सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पन्नास हजार रुपये रोख आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. कराड येथील निवृत्त प्राध्यापक नारायणराव टिळक यांनी त्यांच्या दिवंगत पत्नी गायिका स्वरगंधा टिळक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुरस्कृत केला आहे.
या वेळी भारतातील विविध ठिकाणी असलेले त्यांच्या कुटुंबातील सतारवादक रईस खान, हाफीज बाले खान, छोटे रहिमत खान, रफीक खान, शफीक खान, मोहसिन, कन्या रुकैया आणि नात माध्यमी हे सर्व कलाकार एकत्र येणार आहेत. हे सर्व कलाकार ‘सतार संध्या’ या कार्यक्रमात एकत्रितपणे सतार वादन करणार आहेत. पांडुरंग पवार तबल्यावर साथ देणार आहेत. हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य खुला आहे.