भयंकर..! एसटी प्रशासनाने पैसे वाचविण्यासाठी नेमले केवळ चारच सुरक्षारक्षक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 11:23 IST2025-02-27T11:22:22+5:302025-02-27T11:23:00+5:30
एका शिफ्टमध्ये ८ सुरक्षारक्षक असणे आवश्यक आहे.

भयंकर..! एसटी प्रशासनाने पैसे वाचविण्यासाठी नेमले केवळ चारच सुरक्षारक्षक
पुणे : कामगार मंत्रालयाच्या निर्देशानुसार एका शिफ्टसाठी ८ सुरक्षारक्षक नेमणे गरजेचे असतानादेखील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) केवळ पैसे वाचविण्यासाठी एका शिफ्टसाठी ४ सुरक्षारक्षकांचीच नेमणूक केली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
स्वारगेट स्थानकात घडलेल्या प्रकरणात २३ सुरक्षारक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. पण हा एकप्रकारे सुरक्षारक्षकांवर अन्याय असल्याचे सांगितले जात आहे. कामगार मंत्रालयाच्या निर्देशानुसार, एका शिफ्टमध्ये ८ सुरक्षारक्षक असणे आवश्यक आहे. एसटी प्रशासन सुरक्षारक्षक महामंडळाच्या माध्यमातून सुरक्षारक्षकांची नियुक्ती करते. मात्र एसटी प्रशासनाने एकूण ४५ सुरक्षारक्षक कागदोपत्री दाखविले असून, एका शिफ्टमध्ये केवळ ४ सुरक्षारक्षकांचीच नेमणूक केली असल्याचे सूत्रांनी संगितले. यातही जे २३ सुरक्षारक्षक दाखविले आहेत त्यातील ४ सुरक्षारक्षक हे शिवाजीनगर बसस्थानकामध्ये नेमले आहेत. याचा अर्थ स्वारगेटचेच सुरक्षारक्षक शिवाजीनगर एसटी स्थानकात काम करीत आहेत. त्यामुळे स्वारगेटमध्ये सुरक्षारक्षकांची संख्या केवळ १९ च्या आसपास आहे.
एसटी प्रशासनाने शिवाजीनगर स्थानकामध्ये सुरक्षारक्षकच नियुक्त केले नसल्याचे सांगण्यात आले आहे. स्वारगेट बसस्थानक पाहिले तर तिथे तीन गेट आहेत इन, आउट व एक वर्कशॉप गेट आहे. उर्वरित एक सुरक्षारक्षक सर्व यार्ड बघू शकत नाही. घटना घडली त्यावेळी केवळ चारच सुरक्षारक्षक होते, असेही सूत्रांनी सांगितले.