खासगी ट्रॅव्हल्सकडून स्वारगेट चौक ‘हायजॅक’
By admin | Published: August 29, 2015 03:41 AM2015-08-29T03:41:42+5:302015-08-29T03:41:42+5:30
रक्षाबंधनानिमित्त परगावी जाण्यासाठी प्रवाशांनी स्वारगेट एसटी स्थानक आणि जेधे चौकातून सुटणाऱ्या खासगी प्रवासी बसमधून जाण्यासाठी गर्दी केल्यामुळे मध्यरात्रीपर्यंत या भागात मोठी वाहतूककोंडी झाली होती.
पुणे : रक्षाबंधनानिमित्त परगावी जाण्यासाठी प्रवाशांनी स्वारगेट एसटी स्थानक आणि जेधे चौकातून सुटणाऱ्या खासगी प्रवासी बसमधून जाण्यासाठी गर्दी केल्यामुळे मध्यरात्रीपर्यंत या भागात मोठी वाहतूककोंडी झाली होती.
एसटी महामंडळाने सोडलेल्या जादा बसमुळे स्वारगेट चौक जाम झाला होता. यासोबतच खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसही रस्त्यावर उभ्या केल्याने वाहतूककोंडीमध्ये भर पडली. स्वारगेट आगारामध्ये एसटीच्या बस लावण्यासाठी जागाच शिल्लक राहिली नसल्याने बसच्या लांबच लांब रांगा रस्त्यावर लागल्या होत्या. तसेच टिळक रस्त्याने येणारी वाहतूक
जेधे चौकामध्ये अडकून पडली होती. तर, शिवाजी रस्त्यावरून आणि सोलापूर रस्त्यावरून येणाऱ्या
वाहनांना पुढे जायलाही जागा
मिळत नव्हती. एसटी महामंडळाच्या आणि कर्नाटक महामंडळाच्या बसची रांग लांबवर आल्याने सातारा रस्त्याच्या दिशेने जाणारी वाहने सारसबागेच्या दिशेने वळविण्यात आली होती. एसटी बसमुळे झालेली वाहतूककोंडी खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसमुळे अधिकच गंभीर झाली. एवढ्या मोठया प्रमाणात वाहतूककोंडी होऊनही वाहतूक नियंत्रक पोलीस मात्र चौकामध्ये उपस्थित नव्हते.