स्वारगेट ते कात्रजही धावणार मेट्रो, प्राथमिक प्रस्ताव, महामेट्रो कंपनीचीही तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 03:39 AM2017-12-13T03:39:11+5:302017-12-13T03:39:23+5:30
‘स्वारगेट ते कात्रज’ अशा मेट्रो मार्गाचे कामही सध्या सुरू असलेल्या मेट्रोच्या कामाबरोबरच सुरू होण्याची शक्यता आहे. महापालिकेने याबाबत महामेट्रोच्या अधिकाºयांशी चर्चा केली असून, त्यात प्रकल्प अहवाल तयार करण्याचे मान्य झाले आहे.
पुणे : ‘स्वारगेट ते कात्रज’ अशा मेट्रो मार्गाचे कामही सध्या सुरू असलेल्या मेट्रोच्या कामाबरोबरच सुरू होण्याची शक्यता आहे. महापालिकेने याबाबत महामेट्रोच्या अधिकाºयांशी चर्चा केली असून, त्यात प्रकल्प अहवाल तयार करण्याचे मान्य झाले आहे. त्यासाठीचा अर्धा खर्च देण्याची तयारी महापालिकेने दर्शवली आहे. असा प्रस्ताव आल्यानंतर, त्यावर सकारात्मक विचार करण्यात येईल, असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
‘वनाज ते रामवाडी’ व ‘पिंपरी- चिंचवड ते स्वारगेट’ (व्हाया शिवाजीनगर ते स्वारगेट भुयारी मार्ग) अशा दोन मार्गांचे काम सध्या सुरू झाले आहे. त्याचवेळी ‘शिवाजीनगर ते हिंजवडी’ व ‘स्वारगेट ते कात्रज’ अशा विस्तारीत मार्गाचीही मागणी झाली होती. या रस्त्यांवरील गर्दी लक्षात घेता, त्यांच्या सुरुवातीपर्यंत मेट्रो आणून तिथेच सोडून देणे योग्य नाही, असे मत सर्व स्तरातून व्यक्त करण्यात येत होते. हिंजवडी येथील आय.टी.पार्ककडे वाढणारा गर्दीचा ओघ लक्षात घेऊन पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने ‘शिवाजीनगर ते हिंजवडी’ हा मार्ग करणार असल्याचे जाहीर करून त्याची तयारीही सुरू केली.
‘स्वारगेट ते कात्रज’ हा मार्ग मात्र चर्चेतून मागे पडला. महापालिकेचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी त्याला आता गती दिली आहे. महामेट्रोच्या मुंबई व पुण्यातील मेट्रो प्रकल्पांचे वरिष्ठ अभियंते रामनाथ सुब्रम्हण्यम व अन्य काही अधिकाºयांबरोबर त्यांनी मुंबईत चर्चा केली. त्यात त्यांनी या मार्गाबाबत विचारणा केली. त्याचा प्रकल्प अहवाल तयार करावा लागेल असे त्यांना सांगण्यात आले. त्यासाठीचा खर्च ६० लाख रुपये
आहे. त्यातील निम्मी म्हणजे ३० लाख रुपये रक्कम महापालिकेच्या वतीने दिल्यास प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू करता येईल, असे त्यांनी सांगितले.
भिमाले यांनी व महापालिकेतील अन्य पदाधिकाºयांबरोबर प्राथमिक चर्चा केली असून, त्यांनीही याला मान्यता दिली आहे. महापालिका आयुक्तांबरोबर बोलून याला आता अंतिम स्वरूप देण्यात येईल व लगेचच प्रकल्प अहवाल सुरू करण्यास सांगण्यात येईल, असे ते म्हणाले. बीआरटी मार्ग, वाढती वाहने व व त्या तुलनेत अरुंद असणारा रस्ता यामुळे या भागात सातत्याने वाहतूक कोंडी होत असते. ती सोडविण्यासाठी मेट्रो हा प्रभावी पर्याय ठरेल, असे मत भिमाले यांनी व्यक्त केले.
हे अंतर सुमारे ६ किलोमीटर आहे. स्वारगेटपासून हा मार्ग सुरू होईल व तो कात्रजला संपेल. स्वारगेटपर्यंत येणाºया भुयारी मार्गाला जोडूनच हा मार्ग असेल. स्वारगेटजवळच्या प्रमुख स्थानकाशिवाय तिथपासून ते कात्रजपर्यंतही काही स्थानके असतील. या मार्गाचा साधारण
खर्च ३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल, असा अंदाज महामेट्रोच्या अधिकाºयांनी व्यक्त केला असल्याची माहिती भिमाले यांनी दिली. या खर्चाचा काही भाग महापालिका उचलेल व उर्वरित रक्कम केंद्र व
राज्य सरकार यांनी द्यावी
यासाठी महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न करता येतील, असेही
त्यांनी सांगितले.
काम त्वरित करणार
महापालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक यांच्याबरोबर चर्चा करू, त्यानंतर महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याबरोबर बोलून लवकरच ‘स्वारगेट ते कात्रज’ या मेट्रो मार्गाची मागणी करणारा प्रस्ताव महामेट्रोकडे सादर करू, असे भिमाले म्हणाले.
या भागातील वाहतुकीची कोंडी; तसेच नागरिकांची गरज लक्षात घेऊन या मार्गाचे काम सर्व प्रशासकीय पूर्तता पूर्ण होऊन त्वरित सुरू व्हावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील असे त्यांनी सांगितले.
स्वारगेटपर्यंत मेट्रो येणार व त्यापुढे ती जाणार नाही हे नागरिकांना अजिबात पसंत नव्हते. वास्तविक कात्रजहून याच मार्गाने सर्वाधिक वाहने शहरात जात-येत असतात. त्यातूनच सातत्याने वाहतूककोंडी होत असते. मेट्रो असेल तर रोज जाणारे-येणारे खासगी वाहन न वापरता मेट्रो- नेच प्रवास करण्याला प्राधान्य देतील व त्यामुळे रस्त्यावरची वाहनसंख्या कमी होईल.
- श्रीनाथ भिमाले,
सभागृह नेते, महापालिका
या मार्गासाठी महापालिका प्रयत्न करीत आहे, सहभागही देण्याची तयारी दाखवत आहे ही आमच्यासाठी चांगलीच गोष्ट आहे. ‘स्वारगेट ते कात्रज’ हा विस्तारीत मार्ग आवश्यकच आहे. तो व्हावा, यासाठी सर्व सकारात्मक प्रयत्न करण्यात येतील. आमची त्यासाठी सर्व सज्जता आहे.
- ब्रिजेश दीक्षित,
व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो