स्वारगेट मेट्रो धावणार निगडीपर्यंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 01:49 AM2019-02-28T01:49:47+5:302019-02-28T01:49:50+5:30
मंत्रिमंडळाची मंजुरी : एक हजार ४८ कोटींचा आराखडा; स्वारगेट ते कात्रज प्रस्ताव मागे पडला
पिंपरी : पहिल्या टप्प्यातील स्वारगेट ते पिंपरी या मेट्रो मार्गाचे निगडीपर्यंत आणखी साडेचार किलोमीटर अंतर वाढविण्यास राज्य मंत्रिमंडळाने आज हिरवा कंदील दाखविला. महामेट्रोने निगडीपर्यंतच्या वाढीव मार्गासाठी केलेल्या सुमारे १ हजार ४८ कोटींचा आराखडा राज्य शासनाच्या मान्यतेनंतर केंद्र शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवडचा झपाट्याने विकास होत आहे. पुढील २० वर्षांतील संभाव्य ४० लाख लोकसंख्या ग्रहित धरून पिंपरी-चिंचवड मेट्रो निगडीपर्यंत वाढविण्याची मागणी लोकप्रतिनिधी व स्वयंसेवी संस्थांनी केली होती. पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या सर्वसमावेशक वाहतूक आराखड्यात निगडीपर्यंत मेट्रोची शिफारस केली होती. त्यानुसार महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (महामेट्रो) सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला होता. पिंपरी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत डिसेंबर २०१८ मध्ये या डीपीआरला मंजुरी दिली होती.
पहिल्या टप्प्यातील स्वारगेट ते पिंपरी या सुमारे १६.५ किलोमीटर मेट्रो मार्गाचे काम प्रगतिपथावर आहे. त्यामुळे पिंपरी हद्दीतील मेट्रो मार्गाचे काम डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. या मार्गावरील रेंजहिल ते स्वारगेट मेट्रो भुयारी असल्याने नोव्हेंबर २०२१ पर्यंत कार्यान्वित होण्याचा अंदाज आहे. डिसेंबर २०१९ ते नोव्हेंबर २०२१ या काळात पिंपरी ते निगडी या वाढीव मार्गाचे काम पूर्ण करण्याची मागणी नागरिक, राजकीय संघटना व पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमच्यावतीने केली होती.
निगडीपर्यंत मेट्रोमुळे पिंपरी-चिंचवड परिसरातील सर्व दाट लोकवस्ती असलेले भाग मेट्रोमुळे जोडले जातील. या विस्तारामुळे एक प्रभावी शहरी वाहतूकव्यवस्था निगडी, पिंपरी-चिंचवडकरांना मिळणार असून, या भागातील वाहतूक सुरळीत व्हायला खूप मदत होणार आहे. याबरोबरच पीसीएमसी ते स्वारगेट या मेट्रोची प्रवासी वाहतूक
वाढणार आहे.
- श्रावण हर्डीकर, आयुक्त
पिंपरी ते निगडी या विस्तारीत मेट्रो मार्गाची नितांत गरज आहे. यामुळे निगडी (भक्ती-शक्ती चौक) थेट स्वारगेट, मंडई, फडके हौद, शिवाजीनगर, सिव्हिल कोर्ट या भागांशी जोडला जाईल. मेट्रोचा पूर्व-पश्चिम मार्गिका जी पीसीएमसी ते स्वारगेट अशी बनविण्यात येत आहे, आता या विस्तारामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरच्या पश्चिमेकडील दाट वस्ती असलेल्या सर्व भागांना जोडण्याचे काम होईल.
- डॉ. ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक,महामेट्रो.
स्वारगेट ते कात्रज प्रलंबितच
राज्य मंत्रिमंडळात पिंपरी-चिंचवड मेट्रो थेट निगडीपर्यंत नेण्यास मान्यता मिळाली असली तरी शहरासाठी महत्त्वाचा असलेला स्वारगेट ते कात्रज हा मार्ग मात्र अद्याप प्रलंबितच आहे. तो कुठून व कसा न्यायचा, अद्याप निर्णय व्हायला तयार नाही. पालिकेने या मार्गाला मंजुरी दिली आहे. प्रकल्प अहवालासाठी महामेट्रोला पैसेही उपलब्ध करून दिले आहेत. प्रकल्प अहवाल करण्याचे काम सुरू आहे. हा मार्ग भुयारीच करणे योग्य असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री तसेच महामेट्रोच्या स्तरावर चर्चाही झाली आहे. प्रकल्प अहवालही त्याप्रमाणेच तयार केला जात आहे. अहवाल तयार झाला, की राज्य मंत्रिमंडळ या मार्गालाही मंजुरी देईल. स्वारगेट ते खडकवासला, वनाजपासून पुढे शिवसृष्टी कोथरूडपर्यंत असेही काही मार्ग प्रलंबित आहेत. राज्य सरकार ते करण्यासाठी प्रयत्नशील असून स्वत: मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले आहे. वेळ लागेल, मात्र पुण्यात मेट्रोचे जाळे नक्की तयार होईल व वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होईल. - श्रीनाथ भिमाले,
सभागृहनेते,
महापालिका