३० जागा बदलल्या, ७ व्यक्तींना भेटला; पोलिस तपासात दत्ता गाडेबाबत आणखी धक्कादायक माहिती उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 22:14 IST2025-03-07T22:13:26+5:302025-03-07T22:14:45+5:30
जुन्या गुन्ह्यांबाबत काही धागेदोरे हाती लागतात का, हे पाहण्यासाठी पोलिसांनी आज त्याच्या घराची झाडाझडती घेतली.

३० जागा बदलल्या, ७ व्यक्तींना भेटला; पोलिस तपासात दत्ता गाडेबाबत आणखी धक्कादायक माहिती उघड
किरण शिंदे, लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे |
Pune Crime: स्वारगेट बलात्कार प्रकरणातील तपासादरम्यान आरोपी दत्ता गाडे याचा मोबाईल शोधण्यासाठी पोलिसांचे पथक आज शिरूर तालुक्यातील गुणाट शिवारात गेले होते. या शोधकार्यावेळी पोलिसांना आरोपीबाबत धक्कादायक माहिती मिळाली आहे. स्वारगेट बसस्थानकात तरुणीवर अत्याचार करून फरार झालेला दत्ता गाडे हा तीन दिवस ३० वेगवेगळ्या ठिकाणी लपला होता. या सर्व ठिकाणी आज पोलिसांनी त्याच्या मोबाईलचा शोध घेतला. परंतु अद्याप हा मोबाईल पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, फरार असताना दत्ता गाडे हा गावातील ७ व्यक्तींना भेटला होता. त्या सर्व व्यक्तींचा पोलिसांनी आज जबाब नोंदवला आहे. त्यानुसार गाडे हा एका ठिकाणी गॅरेजमध्ये गेला होता, तसंच त्याने एका ओळखीच्या व्यक्तीला जेवण मागितले आणि एका ठिकाणी पाणी पिण्यासाठी गेला होता.
आरोपी दत्ता गाडेच्या घराची पोलिसांकडून झाडाझडती
दत्ता गाडे हा अट्टल गुन्हेगार असून त्याने यापूर्वीही अनेक दुष्कृत्य केली आहेत. जुन्या गुन्ह्यांबाबत काही धागेदोरे हाती लागतात का, हे पाहण्यासाठी पोलिसांनी आज त्याच्या घराची झाडाझडती घेतली. दोन दिवसांपूर्वी पोलिसाचा गणवेश घातलेला दत्ता गाडेचा फोटो व्हायरल झाला. तो फोटो रामोजी फिल्म सिटीतला असल्याचा गाडे सांगत आहे. मात्र ही माहिती खोटी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, पोलिसांनी आज जवळपास १५० एकर परिसरात दत्ता गाडे ज्या ज्या ठिकाणी लपला होता त्या त्या ठिकाणी मोबाईलचा शोध घेतला. परंतु हा मोबाईल अद्याप पोलिसांच्या हाती लागला नसून अद्याप शोध सुरू आहे.