बसचा लॉक केलेला दरवाजा उघडला कसा?; स्वारगेट बलात्कार प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 13:02 IST2025-02-27T13:01:18+5:302025-02-27T13:02:17+5:30
गर्दीने गजबजलेल्या स्वारगेट बसस्थानकात अनेक एसटी बसेस धूळखात पडून आहेत.

बसचा लॉक केलेला दरवाजा उघडला कसा?; स्वारगेट बलात्कार प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर
पुणे - बुधवारी स्वारगेट बस स्थानकात एका युवतीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली. या घटनेमुळे राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विरोधकांनी या घटनेवरून सत्ताधारी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी फरार आरोपीला पकडण्यासाठी १ लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे. स्वारगेटसारख्या पुण्यातील मध्यवर्ती परिसरात घडलेल्या या घटनेने पोलिसांवर कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. त्यातच आता या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
ज्या बसमध्ये ही घटना घडली त्या बसचा दरवाजा चालकाने लॉक केला होता परंतु बसचा एअर प्रेशर उतरल्याने कदाचित या बसचा दरवाजा उघडला असण्याची शक्यता आहे. बसचा एअरप्रेशर उतरल्याने आतील दरवाजा ऑटोमॅटिक उघडतो. खात्यातंर्गत चौकशीत बस चालकाने बस लॉक केल्याची माहिती दिली. बस आगारात आल्यानंतर प्रथम त्याची लॉगशीट भरली जाते. गाडी सुरू झाल्यानंतर ऑटोमॅटिक एअर प्रेशर भरते. एअर प्रेशर उतरल्यानंतर लॉक केलेला दरवाजा उघडू शकतो अशी माहिती इथल्या तांत्रिक विभागातील कर्मचाऱ्याने दिली.
बसमध्ये बाटल्या, कंडोम अन् साडीदेखील...
शहरातील स्वारगेट आणि छत्रपती शिवाजीनगर या दोन्ही बसस्थानकांचा परिसर मोठा आहे. तुलनेने या परिसरात हायमास्ट दिव्यांची कमतरता असल्याने बऱ्याच परिसरात अंधार असतो. याच संधीचा फायदा घेत सराईत गुन्हेगारांचा येथे सुळसुळाट झाला आहे. या ठिकाणी दिवसापेक्षा रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त असते. शिवाय सध्या महिला प्रवाशांची संख्या तुलनेने जास्त आहे. त्याचाच फायदा गुन्हेगार घेतात. त्यात गर्दीने गजबजलेल्या स्वारगेट बसस्थानकात अनेक एसटी बसेस धूळखात पडून आहेत. बलात्काराच्या घटनेनंतर राजकीय कार्यकर्त्यांनी या बसेसची पाहणी केली. त्यावेळी अनेक बसेसमध्ये दारूच्या बाटल्या आणि कंडोमच्या पाकिटांचा खच पडल्याचे उजेडात आले. यावरूनच हे बसस्थानक आहे की अवैध धंद्यांचा अड्डा, असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य नागरिकांमधून केला जात आहे.
दरम्यान, या घटनेतील दत्ता गाडे हा सराईत गुन्हेगार असून, पूर्वी जबरी चोरीचे दोन गुन्हे ग्रामीण पोलिसांत दाखल आहेत. आता त्याचा शोध घेण्यासाठी आठ पथके तैनात केली असून, त्याच्या भावाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तसेच तरुणीवर ससून रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुण्यात नोकरी करणारी तरुणी पहाटे साडेपाचच्या सुमारास फलटणला जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकात आली होती. बसची वाट पाहत असताना गाडेने तिला हेरले. त्याने फलटणला जाणारी बस इथे लागत नाही, पलिकडे लागते असे तिला सांगितले. पीडितेने मी नेहमीच जाते, इथे बस लागते असे सांगत त्याला नकार दिला. यावर त्याने तिचा विश्वास संपादन करत तिला शिवशाही बसजवळ नेले व ही बस जात असल्याचे सांगत तिला त्यात बसण्यास सांगितले. बसमध्ये अंधार असल्याचे तिने म्हणताच त्याने हवे तर तू मोबाईलची लाईट लाव आणि आत पाहून ये, लोक झोपली आहेत, असे सांगितले. यावर ती आतमध्ये जात असताना त्याने तिला मागून पकडले व गळा आवळला. त्यानंतर तिला धमकी देत बलात्कार केला.