पुण्यात हायव्हॉल्टेज राडा! योगेश कदमांचा ताफा अडवला; संतप्त महिलांचा आक्रोश
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 12:16 IST2025-02-27T12:15:48+5:302025-02-27T12:16:19+5:30
पोलिसांना साधा आरोपी पकडता येत नाही. राजकीय दबावामुळे पुण्यात अशी अनेक प्रकरणे दाबली जातात असा आरोप तृप्ती देसाई यांनी केला.

पुण्यात हायव्हॉल्टेज राडा! योगेश कदमांचा ताफा अडवला; संतप्त महिलांचा आक्रोश
पुणे - स्वारगेट बस स्थानकात एका युवतीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेने राज्यात खळबळ माजली आहे. या घटनेवर विविध पडसाद उमटताना दिसून येतंय. त्यात आज गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वारगेट बस स्थानकातील सुरक्षेचा आढावा घेतला. परंतु योगेश कदम यांची कार अडवण्याचा प्रयत्न सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. या प्रकाराने मोठा गोंधळ उडाला. पोलिसांनी तृप्ती देसाई आणि आंदोलक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
यावेळी तृप्ती देसाई म्हणाल्या की, ज्यांनी गुन्हा केला त्यांना पकडले जात नाही. पुण्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उभा राहिला आहे. आरोपीला अटक होत नाही. पोलीस यंत्रणा काय करते, जर आरोपीला अटक होत नाही. लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करत असताना आम्हाला जबरदस्तीने ताब्यात घेतले. आरोपीला वेगळा न्याय आणि आम्हाला वेगळा न्याय दिला जातो. आम्ही योगेश कदम यांना जाब विचारायला गेला होतो. आरोपीला पकडण्यासाठी १ लाखाचे बक्षीस जाहीर करता, पोलिसांना साधा आरोपी पकडता येत नाही. राजकीय दबावामुळे पुण्यात अशी अनेक प्रकरणे दाबली जातात असा आरोप त्यांनी केला.
तसेच ५० टक्के महिलांना तिकिट दर असल्याने जास्त महिला एसटीतून प्रवास करतात अशात एसटीमध्ये महिला सुरक्षा नाही. योगेश कदम यांना जनतेने निवडून दिलंय. वाहन थांबवून आम्ही त्यांना जाब विचारू शकतो. आम्हाला धरपकड करून पोलीस ताब्यात घेतात तसे आरोपीला पकडा. हे पुणे पोलिसांचे अपयश आहे. १ लाखाचे बक्षीस जाहीर करावे लागते तिथेच पोलीस निष्क्रिय आहेत हे दिसून येते. पुण्याच्या मध्यवर्ती भागातून आरोपी पळून जातो की पळवला जातो. वाल्मिकी कराडलाही पुण्यात लपवून ठेवला होता. तसा या गुन्ह्यातील आरोपीलाही लपवलं आहे का, यंत्रणा काय करतेय असा सवाल तृप्ती देसाई यांनी उपस्थित केला.
VIDEO | Pune Rape Case: Social activist Trupti Desai says, “It has been 48 hours since the rape incident happened at Swargate bus stand. What’s the government doing? The culprit has not been arrested yet. Women travel in buses with faith that these are government buses but if… pic.twitter.com/f5ldMXiDlT
— Press Trust of India (@PTI_News) February 27, 2025
दरम्यान, गृह राज्यमंत्री योगेश कदम इथं आलेत, ते कुठल्या तोंडाने आलेत, काय सांगायला आलेत. आरोपीला पकडून घेऊन या. लोकशाहीत आम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. योगेश कदम यांना आम्हाला भेटायचे होते. त्यांना जाब विचारायचा होता असं सांगत तृप्ती देसाई यांनी योगेश कदम यांच्यावर टीका केली.