Pune Metro: स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गावर आता ५ स्थानके; वाढीव खर्च ३ हजार कोटींवर, करणार कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 10:12 IST2025-02-21T10:12:24+5:302025-02-21T10:12:54+5:30
स्वारगेट ते कात्रज भूमिगत मेट्रो मार्गावर आता ५ स्टेशन करण्यात येणार असून त्यासाठीचा खर्च पुणे महापालिका करणार नाही

Pune Metro: स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गावर आता ५ स्थानके; वाढीव खर्च ३ हजार कोटींवर, करणार कोण?
पुणे : शहरातील बहुचर्चित स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गावरील भूमिगत स्थानकांच्या जागांमध्ये बदल करण्यात आले आहेत. या मार्गावर ३ ऐवजी ५ भूमिगत मेट्रो स्टेशन तयार केली जाणार आहेत. त्यामुळे सातारा रस्ता परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील दोन मार्गांचे काम पूर्ण झाले आहे. वनाज ते रामवाडी, पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या मार्गावर मेट्रो सेवा सुरू करण्यात आली आहे. यामधील पिंपरी चिंचवड ते स्वारगेट मार्गाचे दोन्ही बाजूला विस्तारीकरण केले जाणार आहे. पिंपरी चिंचवड ते निगडीपर्यंत रूट असणार आहे, याचे प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे. तसेच स्वारगेट ते कात्रज या मार्गाला मंजुरी देऊन त्याचेही काम निविदा काढून लवकरच सुरू केले जाणार आहे. मात्र निविदा काढण्याआधी स्वारगेट ते कात्रज मार्गावर प्रस्तावित करण्यात आलेल्या ३ भूमिगत स्थानकांवर लोकसंख्येच्या घनतेचा विचार करून योग्य बदल करण्याची मागणी विविध लोकप्रतिनिधींनी महामेट्रो प्रशासनाकडे केली होती. मार्गाच्या या पूर्वीच्या मार्केट यार्ड, पद्मावती व कात्रज स्टेशनचा समावेश होता. कात्रज स्थानक राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या जवळ दाखविण्यात आले होते.
मेट्रो स्टेशनच्या जागेत बदल
नव्या डीपीआरमध्ये ३ च्या ऐवजी ५ स्टेशन प्रस्तावित करण्यात आली आहेत. यामध्ये बालाजीनगर व बिबवेवाडी-सहकारनगर स्थानकांचा समावेश आहे. स्थानकांच्या जागांमध्ये बदल केल्यानंतर नव्या डीपीआरला मनपाच्या साधारण सभेची मंजुरी घेऊन प्रस्ताव राज्य सरकारकडे पुढील मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.
नवीन मेट्रो स्टेशनचे नाव, प्रत्यक्ष ठिकाण
मार्केट यार्ड - उत्सव हॉटेल चौक
बिबवेवाडी / सहकारनगर - नातूबाग
पद्मावती - श्री सद्गुरू शंकर महाराज मठाजवळ
बालाजीनगर - भारती विद्यापीठ
कात्रज - कात्रज बसस्टँड, किनारा हॉटेलजवळ
खर्चाचा भार कोणी उचलायचा यावरून वाद
स्वारगेट ते कात्रज या भूमिगत मेट्रो मार्गावरील वाढीव मेट्रो स्थानकाचा खर्च ६८३ कोटी रुपयांनी वाढून ३ हजार ६३७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मात्र, हा वाढणारा खर्च नक्की कोण करणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
स्वारगेट ते कात्रज भूमिगत मेट्रो मार्गावर आता पाच स्टेशन करण्यात येणार आहेत. मात्र त्यासाठीचा खर्च पुणे महापालिका करणार नाही. या स्थानकांचा खर्च पुणे मेट्रो करणार आहे.- युवराज देशमुख, मुख्य अभियंता, भवन विभाग