दागिने हिसकावणाऱ्या चोरट्यांचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:11 AM2021-09-11T04:11:03+5:302021-09-11T04:11:03+5:30
पुणे : सणासुदीच्या काळात दागिने हिसकावणाऱ्या घटना वाढल्या आहेत. सिंहगड रस्ता, कोथरूड भागात चोरट्यांनी दोन महिलांचे दागिने हिसकावून ...
पुणे : सणासुदीच्या काळात दागिने हिसकावणाऱ्या घटना वाढल्या आहेत. सिंहगड रस्ता, कोथरूड भागात चोरट्यांनी दोन महिलांचे दागिने हिसकावून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. तर नगर रस्त्यावर पादचारी युवतीचा मोबाइल पळवला आहे.
धायरी भागात भाजी खरेदीसाठी निघालेल्या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील ४५ हजारांचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून नेले. शारदा निकेतन गार्डन सोसायटीसमोर हा प्रकार घडला. ज्येष्ठ महिलेने आरडाओरडा केल्यानंतर चोरटे दुचाकीवरून पसार झाले. सिंहगड पोलीस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक प्रतिभा तांदळे तपास करत आहेत. कोथरूड भागात शास्त्रीनगर परिसरात पादचारी ज्येष्ठ महिलेकडील एक लाख ६५ हजारांचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना उघडकीस आली. शास्त्रीनगर परिसरातील जिजामाता गार्डन परिसरात ही घटना घडली. याबाबत महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक कुलकर्णी तपास करत आहेत. दरम्यान, नगर रस्त्यावर खराडी परिसरात पादचारी युवतीकडील मोबाइल संच हिसकावून नेल्याची घटना घडली. विमानतळ पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.
गौरी-गणपतीच्या काळात महिला हौसेने दागिने परिधान करून घराबाहेर पडताना दिसतात. अशा महिलांना लक्ष्य करीत दागिने हिसकावण्याच्या घटनांमध्ये वाढ होते. शक्यतो महिलांनी दागिन्यांचे प्रदर्शन करण्याचे टाळावे तसेच दागिने परिधान केल्यास काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
---