स्वातंत्र्यसैनिक भाई फुटाणे प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 04:43 PM2018-09-18T16:43:37+5:302018-09-18T16:45:44+5:30

पुणे फेस्टिव्हलमध्ये शनिवारी, २२ सप्टेंबर रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित कवी संमेलनात या पुरस्कारांचे वितरण रात्री ९ वाजता करण्यात येणार आहे.

Swatantrya Sainik Bhai phutane Pratishthan Award declared | स्वातंत्र्यसैनिक भाई फुटाणे प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर

स्वातंत्र्यसैनिक भाई फुटाणे प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर

Next
ठळक मुद्देशनिवारी होणार वितरण : सुरेश शिंदे, सुदेश लोटलीकर यांची निवड

पुणे : जामखेडमधील स्वातंत्र्यसैनिक भाई फुटाणे प्रतिष्ठानतर्फे २०१७ सालचा श्री संत नामदेव पुरस्कार करमाळा येथील कवी डॉ. सुरेश शिंदे, तर २०१८ सालचा पुरस्कार फोंडा, गोवा येथील कवी सुदेश लोटलीकर यांना जाहीर झाला आहे. पुणे फेस्टिव्हलमध्ये शनिवारी, २२ सप्टेंबर रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित कवी संमेलनात या पुरस्कारांचे वितरण रात्री ९ वाजता करण्यात येणार आहे. डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी.डी. पाटील यांच्या हस्ते आणि पुणे फेस्टिव्हलचे प्रमुख संयोजक कृष्णकांत कुदळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. 
यापूर्वी हा पुरस्कार प्रा. पुरूषोत्तम पाटील (धुळे), भाऊसाहेब पाटणकर (यवतमाळ), वामन कर्डक (नाशिक), राजा मुकुंद (कंधार), प्रा. वसंत सावंत (सावंतवाडी), रा.ना. पवार (सोलापूर), शाहीर साबळे (मुंबई), फादर फ्रान्सिस दिब्रेटो (वसई), शाहीर विभुते (सांगली), पद्मश्री  ना.धों, महानोर (पळसखेडे), लोकशाहीर विठ्ठल उमप (मुंबई), प्रा. रा.ग. जाधव (वाई), शाहीर शेख जैनुद्दीन चाँद (मुंबई), डॉ. अशोक कामत (पुणे), डॉ.निर्मलकुमार फडकुले (सोलापूर), डॉ. वि.मा. बाचल (पुणे), सत्यपाल वि. सिरसोलीकर (अकोट), शाहीर लीलाधर हेगडे (मुंबई), प्रा. विठ्ठल वाघ (अकोला), प्रा. फ.मुं. शिंदे (औरंगाबाद), अशोक नायगांवकर (मुंबई), अरूण म्हात्रे (मुंबई), संभाजी भगत (मुंबई), आमदार विष्णू सुर्या वाघ (गोवा) या महाराष्ट्रासह बृहन्महाराष्ट्रातील अनेक दिग्गज कवींना प्रदान करण्यात आला आहे. 
या पुरस्काराचे मानकरी कवी डॉ. सुरेश शिंदे हे निवृत्त प्राचार्य असून काटेवन आणि पुस्तकात नसलेली पाने हे दोन काव्यसंग्रह आणि संताचा विद्रोह हा वैचारिक ग्रंथ प्रसिद्ध आहे. कवी सुदेश लोटलीकर यांचे सात कवितासंग्रह प्रकाशित झाले असून विविध साहित्य पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन स्वातंत्र्यसैनिक भाई फुटाणे प्रतिष्ठान जामखेडचे प्रमुख आणि ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी केले आहे.

Web Title: Swatantrya Sainik Bhai phutane Pratishthan Award declared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.