घराबाहेर पडताच घामाच्या धारा; रस अन् फळांच्या ज्यूसमध्ये वापरला जाणारा बर्फ ठरतोय घातक, काळजी घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 11:26 AM2024-03-20T11:26:13+5:302024-03-20T11:27:07+5:30
अस्वच्छ पाण्यापासून बनवलेला बर्फ शरीरात गेल्यास घसादुखी, जुलाब, पाेटाचे विकार इन्फेक्शन बरोबरच अनेक आजारांना निमंत्रण
पुणे : उन्हाळा आता जाेमात सुरू झाला आहे. पुण्याचे कमाल तापमान ३५ ते ४० दरम्यान जात आहे. घराबाहेर पडताच घामाच्या धारा लागत आहेत. यामुळे आपसूकच पावले रस्त्याच्या कडेला असलेले रसवंती गृह, ज्यूस सेंटर अन् लिंबू शरबतच्या टपरीकडे वळतात; परंतु या पेयामध्ये सर्रासपणे वापरला जाणारा बर्फ खाण्यायोग्य तरी आहे का? शहरात अखाद्य बर्फाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून पुणेकरांच्याआरोग्याशी हा खेळ सुरू आहे. दरम्यान, ‘एफडीए’चे या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असून अखाद्य बर्फाची निर्मिती राेखण्याचे आव्हान एफडीएसमाेर आहे.
धक्कादायक म्हणजे, अनेक विक्रेत्यांना कुठला बर्फ खाण्यायोग्य अन् कुठला अयोग्य हेदेखील माहिती नसल्याचे समाेर आले आहे. मुळात बर्फाचे प्रकारही माहीत नसल्यामुळे सर्वसामान्यांच्या आराेग्याचे प्रश्न उपस्थित हाेत आहे.
शहरातील चाैकाचाैकात रसवंती गृह, ज्यूस सेंटर, आइस्क्रीमच्या हातगाड्या लावलेल्या असतात. यापैकी उसाच्या रसवंतीगृहांची संख्या जास्त आहे. उन्हाच्या चटक्यामुळे काेरडा पडलेला घसा थंड करण्यासाठी नागरिक रसवंतीगृहामध्ये येतात; परंतु हा बर्फ विक्रते ज्या कारखान्यातून घेतात ताे स्वच्छ पाण्यापासून तयार केलेला आहे की नाही? याची मात्र तपासणी हाेत नाही. त्याचबराेबर विक्रेते अस्वच्छ पाेत्याखाली ठेवलेला बर्फाचा तुकडा लाेखंडी सळईने काढतात आणि त्या बर्फाचे खडे तुमच्या हातातील पेयामध्ये मिसळतात. यातून बर्फाची साठवण आणि त्याचा वापर याबाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पुणे शहरात दाेन ठिकाणी खाद्य बर्फ तयार करणारे तर एका ठिकाणी अखाद्य बर्फ तयार करणारा कारखाना आहे, तर ग्रामीण भागात मिळून सहा ते सात कारखाने आहेत. या कारखान्यातून उद्याेगासाठी वापरला जाणारा बर्फ तसेच खाण्यासाठी वापरला जाणाऱ्या बर्फाचे उत्पादन हाेते. उद्याेगासाठी लागणारा बर्फ हा दूध, मासे आणि रासायनिक उत्पादनांचे कूलिंग करण्यासाठी तयार केला जातो. या बर्फातील सर्वच घटक आरोग्याच्या दृष्टीने फार घातक असतात. मग हाच बर्फ खाण्यासाठीही वापरला जाताे. असे असतानाही औद्योगिक वापरासाठी असलेल्या बर्फाची खाद्यपदार्थ म्हणून विक्री होत आहे.
‘कूलिंग’साठी वापरला जाणारा बर्फ हा खाद्यासाठी लागणाऱ्या बर्फाच्या तुलनेत स्वस्त असतो. यामुळे रसवंतीगृह चालक असा स्वस्त बर्फ सर्रास वापरतात. अनेक कारखान्यांकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि जिल्हा उद्योग केंद्र तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे परवाने आहेत. परंतु, बर्फ मात्र अखाद्य स्वरूपाचा तयार केला जात असल्याचेही समोर आले आहे.
खाण्यायोग्य बर्फ तयार करण्यासाठी वापरले जाणारे पाणी हे स्वच्छ असणे अपेक्षित असते. परंतु, दूषित व साठवून ठेवलेले पाणी बर्फ निर्मितीसाठी वापरले जाते. या दूषित जंतूयुक्त पाण्यापासून बनलेला बर्फ पुणेकरांच्या पोटात जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. केवळ रसवंतीगृहातच नव्हे तर विवाह सोहळे, सार्वजनिक अन्नदान, हातगाड्यांवरील बर्फगोळे, कुल्फी, आईस्क्रीम आदी ठिकाणी या बर्फाचा सर्रास वापर केला जात आहे.
साथीच्या आजारांना निमंत्रण
अस्वच्छ पाण्यापासून बनवलेला बर्फ खाण्यात गेल्यास घसादुखी, जुलाब, पाेटाचे विकार इन्फेक्शन हाेतात. दूषित पाण्यातील विषाणू बर्फातून थेट पाेटात जातात. यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळत आहे. तसेच पाेटाच्या तक्रारी समाेर येत आहेत.
बर्फ नकाे आईसक्यूब हवा
‘आईसक्यूब’ हा खाण्यायोग्य बर्फ आहे. परंतु, हा महागडा बर्फ असल्याने याचा वापर मोठी हॉटेल, बीअरबार येथेच होतो. हा बर्फ या हातगाड्यांवरही वापरण्यात यावा, अशी मागणी हाेत आहे. अखाद्य बर्फ बनविणाऱ्या कंपन्या आपला बर्फ मोठ्या आकाराचा व्हावा व तो जास्त वेळ टिकावा यासाठी अमोनियाचा वापर करतात. त्यांच्या जोडीला विविध वायू आणि दूषित पाणी असते म्हणून ताे अशुध्द असताे.
आमच्या रसवंतीगृहात राेज ३० किलाे बर्फ लागतो. तो आम्ही पुणे काॅलेज येथील बर्फाच्या कारखान्यातून विकत घेताे. तेथे केवळ खाण्याच्या बर्फाची निर्मिती हाेते. पंधरा किलाेच्या एका लादीची किंमत १२० रुपये असते. तसेच माझ्याकडे पुणे महापालिकेचा स्वच्छ पाणी वापरण्याचा देखील परवाना आहे. - शुभम पवार, वनराज रसवंती गृह, शुक्रवार पेठ
बर्फ चांगल्या पाण्यापासून बनवायला हवा. तसेच स्वच्छ कंडिशनमध्ये त्याची वाहतूक करायला हवी. विक्रेत्यांनी या कारखान्यांकडून बर्फ विकत घेताना ताे खाण्याचा बर्फ याचे बिल घ्यायला हवे आणि कारखान्यांनीदेखील ते सक्तीचे द्यायला हवे. बर्फ विकत घेणाऱ्यांनी ताे खाण्याचा आहे याचा हट्ट धरावा. सामान्य लाेकांना हा बर्फ काचेसारखा चकाचक व पारदर्शक दिसताेय ना हे पाहायला हवे. ताे नुसता जाडसर नकाे. तसेच अखाद्य बर्फ हा निळा कलर टाकून विकायला पाहिजे. बर्फ तपासणीची लवकरच माेहीम सुरू केली जाणार आहे. - अर्जुन भुजबळ, प्रभारी सहआयुक्त, एफडीए पुणे विभाग