Video: 'स्वेटर' घ्यायचे की 'रेनकोट'? ऐन थंडीच्या हंगामात पुण्यात पावसाची जोरदार हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 06:16 PM2023-11-10T18:16:32+5:302023-11-10T18:49:54+5:30
गुडघाभर पाण्यातून वाट काढताना वाहनधारकांना कसरत तर दिवाळी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली
पुणे : पुणे शहरासह उपनगरात शुक्रवारी (दि.10) सायंकाळी पाचच्या सुमारास सर्व भागांमध्ये जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. अवघ्या अर्धापाऊन तासाच्या पावसाने ठिकठिकाणी आणि मुख्य रस्त्यांवर पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालं. वाहनधारकांनी साचलेल्या पाण्यातून वाट काढत प्रवास करणं पसंत केलं. गुडघाभर पाण्यातून वाट काढताना वाहनधारकांना कसरत करावी लागत होती तर दिवाळी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
ऐन थंडीच्या हंगामात पुण्यात पावसाची जोरदार हजेरी #Pune#Diwali#WINTER#rainpic.twitter.com/wbcV4rnFkX
— Lokmat (@lokmat) November 10, 2023
अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे दक्षिण कोकण तसेच मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये गेल्या तीन-चार दिवसांपासून मध्यम ते मुसळधार पाऊस पडत आहे. तर पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. अरबी समुद्रावर तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र हे आता कमकुवत झाले असून ते पश्चिमेकडे सरकले आहे. मात्र, बंगालच्या उपसागरावरून राज्यावर येणाऱ्या वाऱ्यांमध्ये आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्याने हा पाऊस होत असल्याचे हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम काश्यपी यांनी स्पष्ट केले. मात्र, अरबी समुद्रावरील कमी दाबाचे क्षेत्र कमकुवत झाल्याने शनिवारनंतर दक्षिण महाराष्ट्र तसेच दक्षिण कोकणात हलका पाऊस तर ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. राज्यात अन्यत्र मात्र, हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
पुणे शहरात शुक्रवारी दुपारपासूनच हवामान ढगाळ झाले होते. मात्र साडेपाच दरम्यान कोथरूड औंध, बाणेर, सिंहगड रोड, धनकवडी, सातारा रस्ता, वानवडी, हडपसर या भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह व विजांच्या कडकडाटसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांचा हिरमोड झाला. ऐन दिवाळीतच पाऊस आल्याने अनेक व्यापाऱ्यांच्या व्यवसायाला फटका बसला. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुणे शहरात शनिवारी (दि. ११) दुपारनंतर हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.