पावसाळा सुरु होताच ‘स्वीटकॉर्न’ ची मागणी वाढली..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 04:00 PM2019-07-01T16:00:37+5:302019-07-01T16:23:38+5:30
पावसाळा सुरु होताच पावसाचा, धबधबे पाहण्यासाठी निसर्गाच्या हिरवळीचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक घराबाहेर पडतात.
पुणे : पावसाळ्यामध्ये पर्यटन स्थळी ओले चिंब भिजले असताना आपलं लक्ष वेधून घेते ते गरम वाफेवर भाजले जाणारे मक्याची कणसं..! भिजलेल्या शरीराला आवश्यक ती ऊबदारपणा देण्याचं काम ही मक्याची कणीस करतात..पुण्यात होत असलेल्या जोरदार पावसामुळे पर्यटनस्थळी या स्वीट कॉर्नची मागणी वाढू लागली आहे.
पावसात चिंब भिजल्यामुळे शरीराला कुठेतरी ऊबदार खाद्यपदार्थांचे डोहाळे लागतात.. त्यात गरमागरम भजी, वडापाव, उकडलेल्या भुईमुंगाच्या शेंगा, पराठे, आणि स्वीटकॉर्न...! ह्या स्वीटकॉर्नचं महत्व तसं पावसाळ्यात दुर्लक्षित करण्याजोगं नक्कीच नाही.विस्तवाच्या शेगडीवर भाजलेले मक्याचे कणीस लोकांना आकर्षित करतात.मक्याचे कणीस आयुर्वेदात पण महत्वाचे सांगितले आहे. स्वीटकॉर्नची चटकदार भेळ ही जिभेला सुखावह अनुभव देणारी ठरते.
पावसाळा सुरु होताच पावसाचा, धबधबे पाहण्यासाठी निसर्गाच्या हिरवळीचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक घराबाहेर पडतात. यामुळेच पावसाळा सुरु होताच ‘स्वीटकॉर्नची मागणी वाढू लागली असून, यामुळे दरामध्ये देखील १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
संपूर्ण जून महिना कोरडा गेल्याने पर्यटकांचे डोळे पावसाकडे लागले होते. परंतु गेल्या तीन चार दिवसांपासून संपूर्ण पुणे शहरासह जिल्ह्याच्या विविध ठिकाणी पावसाने चांगली हजेरी लावली आहे. मध्ये पुणे शहरालगत आणि जिल्ह्यात देखील अनेक ठिकाणी पर्याटककांची प्रचंड गर्दी होते. यामध्ये खडकवासल्यापासून ते सिंहगडापर्यंत तर सुट्टीच्या दिवशी पुणेकरांची तुडुब गर्दी होते. या गर्दीचा फायदा घेत लहान-मोठ्या विक्रेत्यांकडून स्वीटकॉर्नची विक्री केली जाते. यामुळेच गेल्या आठ दिवसांपासून येथील गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये स्वीटकॉर्नची मागणी वाढली आहे.
गुलटेकडी येथील मार्केट यार्डात रविवार (दि.३०) रोजी सुमारे दोन हजार पोती मक्याच्या कणसाची आवक झाली. घाऊक
बाजारात १० ते १३ रुपये असा प्रतिकिलोसाठी दर होता. सध्या खेड, मंचर नारायणगाव, बारामती, नाशिक या भागातून कणसाची आवक होत आहे. शहरात सध्या संततधार पावसाला काही दिवसांपासून सुरुवात झाली. सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटनासाठी पुणेकर घराबाहेर पडू लागले आहे. ठिकठिकाणी मक्याच्या कणसाच्या विक्रेत्यांनी भाजलेली कणसे विकायला ठेवल्याचे दिसून येत आहे. परिणामी, पर्यटन ठिकाणी स्वीटकॉर्न, भाजलेल्या कणसांना मागणी वाढली आहे.
मक्याच्या कणसाला मागणी वाढल्याने बाजारात, तसेच किरकोळ ग्राहकांकडून मागणी वाढल्याचे दिसून येत आहे. येत्या आठवड्यात त्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापारी वर्तवित आहेत. पुणे शहराबरोबर जिल्ह्याच्या विविध भागात चांगला पाऊस पडला, तर त्याला आणखी मागणी वाढेल. किरकोळ बाजारात सध्या भाजलेल्या कणसाला २० ते २५ रुपये द्यावे लागत आहेत. पर्यटनस्थळी विक्रेत्यांकडून मक्याच्या कणसाची मोठी विक्री होते. ग्राहकांकडूनही त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे किरकोळ विक्रेत्यांची चांदी होत आहे. एका कणसाला अपेक्षेपेक्षा अधिक भाव आकारला जात असल्याचे व्यापारी पांडुरंग सुपेकर यांनी सांगितले