दूध, साखरेचे दर वाढल्याने मिठाई महागली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:14 AM2021-09-15T04:14:03+5:302021-09-15T04:14:03+5:30
ग्राहकांना आर्थिक फटका : मिठाईचे भाव किलोमागे २० रुपयांपर्यंत वाढले (स्टार ११८० डमी) लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यात ...
ग्राहकांना आर्थिक फटका : मिठाईचे भाव किलोमागे २० रुपयांपर्यंत वाढले
(स्टार ११८० डमी)
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्यात साखरेचे दर चार ते सहा रुपयांनी, तर दुधाचे दर दोन ते चार रुपयांनी वाढले आहेत. त्याचा परिणाम मिठाईच्या दरावरदेखील झाला आहे. सणासुदीच्या काळात विशेषत: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दूध, साखरेचे दर वाढल्याने मिठाईच्या भावात किलोमागे जवळपास २० रुपयांपर्यंत भाव वाढल्याने त्याचा ग्राहकांना चांगलाच फटका बसत आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा गणेशोत्सवाचा उत्साह थोडा जास्त दिसत आहे. गणेशोत्सवात मोदक तसेच विविध प्रकारच्या मिठाईंना चांगली मागणी असते. मिठाई बनवताना दूध आणि साखरेचा वापर प्रामुख्याने होत असल्याने त्याचा दरावर परिणाम झाल्याचे पहायला मिळत आहे. विशेषत: काजू कतली, चॉकलेट बर्फी, मँगो मलाई, पिस्ता बर्फी, कलाकंद, मलई बर्फी, गुलाब जाम (काळा), गुलाब जाम (पाक), सोनपापडी, म्हैसूर पाक आदी मिठाईच्या भावात १५ ते २० रुपयांपर्यंत किलोमागे वाढ झाली आहे.
-----
१) मिठाईचे दर (प्रतिकिलो)
मिठाई सध्याचा दर गणेशोत्सवाआधी
* काजू कतली ९६० ९४०
* चॉकलेट बर्फी ५६० ५४०
* मँगो मलाई ६०० ५८०
* पिस्ता बर्फी ५६० ५४०
* कलाकंद ५६० ५४०
* मलई बर्फी ५६० ५४०
* गुलाब जाम (काळा) ३२० ३००
* गुलाब जाम (पाक) २८० २७०
* सोनपापडी २८० २६०
* म्हैसूर पाक २८० २६०
------
मुद्दे ----
* दुधाचे दर (लिटर) ६२ से ६६ रुपये
* साखरेचे दर (किलो) ३८ ते ४० रुपये
----
* का वाढले दर?
मागील काही दिवसांत दुधाचे भाव चांगलेच वाढले आहे. मिठाई बनवताना सर्वांत जास्त दुधाचा वापर होतो. तसेच, साखरदेखील लागते. दूध आणि साखर या दोघांचेही भाव वाढल्याने साहजिकच मिठाई उत्पादनाचा खर्च वाढला आहे. त्यामुळे किलोमागे काही प्रमाणात मिठाईचे दर वाढलेले आहेत.
- राकेश लाहोटी, स्वीट मार्टचालक
-----
* भेसळीकडे लक्ष असू द्या
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मिठाई विक्रेत्यांना सूचनांचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. विक्रेत्यांना अनेक प्रकारच्या सूचना दिल्या आहेत. तसेच तंतोतत पालन करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर नागरिकांनीदेखील वस्तूची खरेदी करताना काळजी घ्यावी. नियमांचे उल्लंघन करून विक्रेत्यांनी जर भेसळीच्या वस्तू विकल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. भेसळ रोखण्यासाठी दिवाळी सणापर्यंत ही मोहीम राबविण्यात येत आहे, असे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त शिवाजी देसाई यांनी सांगितले.
----
* ग्राहक म्हणतात..
गणेशोत्सव असो की इतर सण. सणासुदीच्या काळात घराघरात मिठाई लागतेच. सध्या दैनंदिन विविध वस्तूंचे दर सातत्याने वाढत आहेत. मात्र, सण असल्याने दर वाढले तरी मिठाई लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करून मिठाई खरेदी करावीच लागते.
- नितीन कदम, ग्राहक
----
* दरांवर नियंत्रण कोणाचेच नाही?
प्रत्येक नागरिकांसाठी सुरक्षित व निर्भेळ अन्न उपलब्ध होण्यासाठी त्याचबरोबर भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने दक्षता घेतली जात आहे. मात्र, विक्रेत्यांनी कोणत्या मिठाईचे दर किती ठेवायचे याचे अधिकार अन्न व औषध प्रशासनाला नाहीत. त्यामुळे मिठाईच्या वाढणाऱ्या दरावर कोणाचेच नियंत्रण नसल्याचे दिसत आहे.